

नगर: बलिदानापूर्वी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना बंदी बनवत अनंत यातना सोसल्याचा साक्षीदार असलेल्या बहादूरगड (आताचा धर्मवीर गड) संवर्धन, विकासासाठी दोनशे कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या शौर्याने पावन झालेला गड लवकरच पर्यटन नकाशावर दिसेल, असा विश्वास आ. विक्रमसिंह पाचपुते यांनी व्यक्त केला. याचसोबत श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख महमद महाराज देवस्थानचा विकास करण्यालाही प्राधान्य देणार असल्याचे आ. पाचपुते यांनी सांगितले.
आ. पाचपुते यांनी शनिवारी सायंकाळी ‘पुढारी’ कार्यालयास भेट देत संपादकीय विभागाशी मनमोकळा संवाद साधला. ब्युरो चीप संदीप रोडे, वरिष्ठ उपसंपादक डॉ. सूर्यकांत वरकड यांनी त्यांचे स्वागत केले. अष्टविनायक धार्मिक पर्यटन करणाऱ्या भाविकांना सिद्धटेक, मोरगाव, रांजणगावहून पेडगावातील या गडावर येणे सुलभ व्हावे यासाठी सिध्दटेक, श्रीगोंदा, काष्टी, अजनूजहून रोड कनेक्टीव्हिटी देण्यात आली आहे. यातील काही रस्त्यांचे कामे पूर्णत्वाकडे तर, काहींची प्रगतीपथावर आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर त्यांना धर्मवीर गडावर बंदी बनून आणले.
तेथे त्यांचा अनन्वीत छळ केला गेला. असा जाज्वल्य इतिहास असलेल्या गडाची माहिती तरूणाईला व्हावी, तसेच ऐतिहासीक पर्यटनस्थळ होण्यासाठी विकास आराखडा पुरातत्व विभागाने तयार केला आहे. त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील असल्याचे आ. पाचपुते यांनी सांगितले. धर्मवीर गड विकासासाठी पर्यटन विभागाने दोन कोटी, तर जिल्हा नियोजनमधून पाच असे सात कोटी मंजूर झाले आहेत. श्रीगोंदा शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता डीपी प्लॅन तयार केला आहे. शहराच्या चोहोबाजूने सिमेंट कॉक्रिटीकरणाचे रस्ते केले जात आहेत.
श्रीगोंदा-काष्टी, श्रीगोंदा-जामखेड रस्त्याची कामे पूर्णत्वाकडे गेली असून श्रीगोंदा-मांडवगण, श्रीगोंदा-कोळगाव, श्रीगोंदा-पेडगाव आणि श्रीगोंदा- शिरूर हायवे रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर श्रीगोंदा शहराभोवती रस्त्यांची जाळे तयार होईल, त्यातून विकासाला गती मिळेल, दुग्ध व्यवसाय, फळबागा आणि भाजीपाला व्यवसायाला चालना मिळेल शेतकरी आर्थिक समृध्द बनेल, असे आ. पाचपुते म्हणाले.
आता जनतेने जागृक व्हावे
मोठा पाठपुरावा केल्यानंतर चीज ॲनलॉगवर बंदी आली. केंद्र व राज्य सरकरने तसा निर्णय घेत परिपत्रकही काढले. आता त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका, अन्न व औषध प्रशासनावर आहे. मात्र जनतेने जागृक होणे गरजेचे असून प्रश्न विचारले, तर बनावट पनीरचा विषय संपलेला दिसेल. या निर्णयामुळे दुधाचे दर टिकून राहिले, एव्हाना दोन रुपयांनी वाढले, असे आ.पाचपुते यांनी सांगितले.
राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि स्वता: यानुसार मी मतदारसंघातील प्रश्न मांडत राहिलो. सत्तेतील आमदार असलो तरी जनहिताच्या प्रश्नांवर सरकारला प्रश्न विचारले पाहिजे. वडील बबनराव पाचपुते मंत्री असताना त्यांच्यासोबत विधीमंडळाच्या गॅलरीत बसून कामकाज पाहिले अन् अनुभवले. प्रश्न मांडताना त्यांचे गांर्भीय आणि पद्धत वडिलांकडून आत्मसात केली. त्या अनुभवातून प्रश्न मांडण्याचे कसब अंगी रुजले. जिल्ह्यातील क्राईम रेशो व संख्याबळाचा विषय विधीमंडळात मांडल्यानंतर जिल्ह्यात सात नवीन पोलिस ठाणे निर्मितीचा निर्णय झाल्याचा आनंद आहे, असे आ.पाचपुते म्हणाले.