गोरक्ष शेजूळ
नगर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारी करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मात्र कलहाची मशाल पेटल्याचे दिसते. पक्षातील एका गटाने सामूहिकपणे व्हिडीओद्वारे थेट पक्षप्रमुखांकडे नाराजी व्यक्त करत जिल्हाप्रमुख (उत्तर) रावसाहेब खेवरे यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.
त्यासाठी गुरुवारी (दि. 18) शिवसेनेच्या वर्धापनदिनीच उत्तरेतील सहा तालुक्यांत काही शिवसैनिकांनी उपोषणास्त्र काढले आहे. दुसरीकडे विद्यमान पदाधिकार्यांमधून खेवरे हेच उत्तम पर्याय आहेत, हे सांगणारे काही व्हिडीओही ‘मातोश्री’पर्यंत पोहचविल्याचे समजते. त्यामुळे ठाकरेंच्या दोन गटांतील ‘व्हिडीओ वॉर’ चर्चेचा विषय बनले आहे. (Latest Ahilyanagar News)
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला मरगळ आली. दक्षिणेत अनेक निष्ठावंतांनी पूर्वीच पक्ष सोडला. विधानसभेला उमेदवारीसाठी पक्षात आलेलेही परतले. शहरातही धुसफूस सुरू आहे. मात्र उत्तरेत शांतता दिसत असतानाच काही दिवसांपासून तिकडेही कलह वाढला आहे.
उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना पदावरून हटविण्यासाठी शिवसैनिकांची एक फळी पुढे आली आहे. अमर कतारी, भाऊसाहेब हासे, भरत मोरे, तांबोळी, अस्लम शेख आदींनी थेट पक्षप्रमुख ठाकरेंकडे ‘आम्हाला खेवरे का नकोत’, याचे सामूहिक मत नोंदविणारे व्हिडीओ पाठवले आहेत.
यामध्ये खेवरे 22 वर्षे जिल्हाप्रमुखपद अडवून बसले आहेत. हे मर्जीतील कार्यकर्त्यांना पदे वाटतात, विरोधकांशी संगनमताने तडजोडीचे राजकारण करतात, यासह अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर केले आहेत. मुंबईतील वरिष्ठ नेते मात्र खेवरेंची पाठराखण करत असल्याची खंत यात व्यक्त होत आहे.
या मोहिमेत महिला आघाडीही सहभागी असून, जिल्हाप्रमुख सपना मोरे, सातपुते आदींनी एका व्हिडीओद्वारे खेवरेंविरोधातील मते ठाकरेंकडे पाठवली आहेत. या मागणीसाठी गुरुवारी अकोल्यातील शिवसैनिक संगमनेरात आणि नेवासा, श्रीरामपूर, राहात्याचे शिवसैनिक कोपरगावात येऊन उपोषण करणार असल्याचे कतारी यांनी ‘पुढारी’ला सांगितले.
दुसरीकडे विद्यमान पदाधिकार्यांनी सांगितले, की खेवरे चांगले काम करत आहेत. त्यांनी तीन टर्म उत्तरेतून पक्षाला खासदार दिला. संघटना मजबूत केली. मात्र ज्यांचे पक्षासाठी योगदान नाही, ज्यांना पदावरून बाजूला केले आहे किंवा ज्यांना पदे हवी आहेत, त्यांच्याकडूनच आरोप केले जात असतील तर दुर्दैवी आहे, अशा आशयाचे व्हिडीओ ‘मातोश्री’पर्यंत पाठवले आहेत. तसेच उपोषण करून पक्षाची बदनामी करणार्यांचीच पक्षप्रमुखांनी हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यात केल्याचे मच्छिंद्र धुमाळ यांनी सांगितले.
आज पक्ष अडचणीत आहे, असे असताना कोणतेही संघटन उभे केले जात नाही, संपर्क ठेवला जात नाही. त्यामुळे निष्क्रिय ठरलेल्या जिल्हा प्रमुख खेवरे यांना हटविण्यासाठी शिवसैनिक उपोषण करणार आहेत. युवा सेना, महिला आघाडी, वाहतूक सेनाही यात सहभागी होणार आहे.- अमर कतारी, माजी शहरप्रमुख, संगमनेर
बावीस वर्षांपासून एकच जिल्हाप्रमुख आहे. उत्तरेत निष्ठावंत असताना त्यांनी पद अडवून ठेवले आहे. प्रत्येक गावात गट-तट करून ठेवले आहेत. जिल्हाप्रमुख बदलाबाबतचे आमचे व्हिडीओ पक्षप्रमुखांना पाठवले आहेत. फोन झाले आहेत.- सपना मोरे, जिल्हाप्रमुख, महिला आघाडी