शिवसेनेचे प्राबल्य असलेला भाग म्हणून परिचित असलेल्या या वार्डात गतवेळी कुमारसिंह वाकळे यांच्या रूपाने घड्याळाची टिकटिक सुरू झाली. शिवसेना दुंभल्यानंतर होऊ घातलेल्या निवडणुकीत सेना विभागणीचा लाभ राष्ट्रवादीला आपसकूच होणार आहे. त्यातच शिवसेनेच्या प्रभावी नगरसेवकाचेही हाती घड्याळ बांधण्याचे ठरले आहे.
वार्डात उबाठा सेनेच्या प्राबल्याला धक्का पोहचणार असल्याचे संकेत यातून मिळू पाहत आहे. माजी नगरसेवक अशोक बडे यांच्यावर उबाठा सेनेची सगळी भिस्त असणार आहे. गतवेळी कुमारसिंह यांच्या विरोधात लढलेले अक्षय कातोरे आता सोबत असल्याने वाकळे यांना अक्षय ऊर्जा मिळाल्याचे चित्र आहे. (Latest Ahilyanagar News)
बोल्हेगाव, नागापूर भागात शिवसेनेचे (एकत्रित) प्राबल्य होते. स्व. अनिल राठोड यांचाही प्रभाव होता. त्यामुळेच गतवेळी अशोक बडे, कमल सप्रे आणि रिता भाकरे हे शिवसेनेचे तीन नगरसेवक विजयी झाले होते. कुमारसिंह वाकळे (राष्ट्रवादी) आणि अक्षय कातोरे (शिवसेना) यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यात कातोरे यांचा निसटता पराभव झाला अन् वाकळे यांच्या रूपाने घड्याळाची टिकटिक सुरू झाली.
बदलत्या राजकारणात शिवसेना दुभंगली. त्याचे परिणाम स्थानिक पातळीवरही उमटले. अक्षय कातोरे हे शिवसेना (शिंदे गट) युवा जिल्हाप्रमुख आहेत. कुमारसिंह वाकळे हे आ. संग्राम जगताप यांचे निकटवर्तीय तर आहेतच, तितकेच विश्वासूही आहेत. महायुतीमुऴे कोतोरे-वाकळे यांची गट्टी जमल्याचे चित्र आहे.
आता अक्षय कातोरे शिवसेनेचे पदाधिकारी असले तरी त्यांची महापालिका निवडणुकीत भूमिका कोणती असेल, याची झलक बॅनरबाजीतून दिसते आहे. त्यांची दिशा ज्याला समजायची त्याला समजली असेलच. त्यामुळेच कोतोरेंच्या दिशेबद्दल अजून संदिग्ध मानले जाते. डॉ. सुजय विखे पाटील यांना मानणारे अनेक तरुण या वार्डात आहे. आ. जगताप व विखे पाटील या दोघांची भूमिका महत्त्वाची आहेच, पण तेच या वार्डाचा राजकीय भूगोल बदलवतील, असेही चित्र दिसू पाहत आहेे.
कुमारसिंह व अक्षय गतवेळीही राष्ट्रवादीकडून लढण्याची तयारी करत होते, मात्र त्या वेळी झालेल्या राजकीय खेळीने कातोरे शिवसेनेत गेले हेोते. आता ते महायुतीतील शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे गतवेळी दुरावलेली वाकळे-कातोरे जोडी आता पुन्हा एकत्र दिसल्यास आश्चर्य वाट्याला नको. याच वार्डात नवनाथ कातोरे हेही राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत.
नागापूर गावठाण तोडल्यानंतर गांधीनगर भाग जोडून नव्या वार्ड रचनेत या प्रभागाची निर्मिती झाली आहे. गांधीनगर हा भाग पूर्वी माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या वार्डाला जोडलेला होता. तो आता नव्या 8 नंबर प्रभागात आला आहे. शिवसेनेचे वर्चस्व संपविण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी कुमारसिंह वाकळे यांना बळ दिले. विकास निधींची कोट्यवधींची उड्डाणे झाली.
ॲड राजेश कातोरे यांना स्वीकृत करत या वार्डाला न्याय देताना राजकीय गणिते तेव्हाच आखली. त्यामुळे राष्ट्रवादीचे चान्सेस वाढले आहेत. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिलेदाराने आ. जगताप यांचे नेतृत्व मान्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
त्यामुळे कुमारसिंह वाकळे यांच्यासाठी ते लाभदायी ठरणार आहे. या वार्डात एक जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. आता नव्याने आरक्षण निघणे बाकी आहे. तसे कसे निघणार तसेच महिला आरक्षण कोणते पडणार? यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. त्यानंतरच उमेदवार निश्चित होईल, पण त्याची वाट न पाहता इच्छुकांनी वार्डात जनसंपर्क चालविला आहे.
उबाठा सेनेची ‘बडे’ भिस्त
माजी नगरसेवक अशोक बडे हे एकमेव उबाठा शिवसेनेचे खंदे समर्थक वार्डात आहेत. पहिल्यापासून ते स्व. राठोड यांचे समर्थक. शिवसेना फुटीनंतर शहरातील अनेक माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. पण बडे मात्र त्यापासून दूर राहिले. अजूनही ते उबाठा सेनेसोबत आहेत. आता बदलत्या राजकीय समीकरणात ते काय भूमिका घेणार, हे पाहण्यासाठी काही काळ थांबावे लागेल. पण त्यांच्यावरच उबाठा सेनेची जबाबदारी असणार, असे चित्र आहे.
राष्ट्रवादी सरप्लस!
महापालिकेत शिवसेनेचा महापौर असूनही वार्डातील स्वपक्षातील नगरसेवकांना निधी मिळत नसल्याची तक्रार त्या वेळी झाली होती. तक्रारीनंतर तो मिळाला असेही नाही, पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्हा नियोजनमधून विकास निधी मिळवत सेना नगरसेवकांनी पत राखली होती. त्यानंतर चप्पलफेक प्रकरणही चांगलेच गाजले. त्याचे परिणाम अजूनही अनेकजण भोगत आहेत. त्यामुळेच उबाठा सेनेचे काही प्र‘भावी’ वेगळ्या विचारापर्यंत पोहचले आहेत. उबाठा सेनेसाठी ही धोक्याची घंटा तर राष्ट्रवादीसाठी लाभदायी मानले जाते.