Shirdi Temple Controversy Pudhari
अहिल्यानगर

Shirdi Temple Controversy: भाविकांना काही सेकंदांचे दर्शन, पण अभिनेत्याला समाधीवर बसण्याची परवानगी? शिर्डीत वाद

मंदिराच्या गाभाऱ्यात समाधी स्पर्श दूरच पण क्षणभर थांबण्याची परवानगी दिली जात नाही. मग कलाकाराला थेट समाधीवर बसण्याचा 'व्हीआयपी' अधिकार कोणी दिला?,

पुढारी वृत्तसेवा

शिर्डी: थेट श्री साईबाबांच्या समाधी चौथऱ्यावर बसून अभिनेत्याने चित्रीकरण केल्याच्या प्रकाराने तासन्‌तास रांगेत उभे राहून केवळ काही सेकंदांचे दर्शन घेणारे भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराने संस्थान प्रशासनाच्या कारभाराचा पंचनामा तर झालाच पण त्याचबरोबर सुरक्षेतील त्रुटीचा गंभीर प्रश्नही ऐरणीवर आला.

मंदिराच्या गाभाऱ्यात समाधी स्पर्श दूरच पण क्षणभर थांबण्याची परवानगी दिली जात नाही. मग कलाकाराला थेट समाधीवर बसण्याचा 'व्हीआयपी' अधिकार कोणी दिला?, असा सवाल करत साईभक्तांसह शिर्डी ग्रामस्थांनीही संस्थान प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे.

या वादग्रस्त चित्रीकरणामुळे संस्थानच्या निर्णयप्रक्रियेवर गंभीर शंका उपस्थित केल्या जात आहेत. चित्रीकरणासाठी तदर्थ समितीची परवानगी होती की नाही तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाजू तपासून पाहण्यासाठी विधी व न्याय विभागाचा सल्ला घेतला होता का?कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने चित्रीकरणाची परवानगी देण्यात आली?, परवानगी देताना लाखो भक्तांच्या श्रद्धेचा विचार का केला गेला नाही?, अतिसंवेदनशील मंदिरात चित्रीकरणाचे साहित्य आणि कलाकार पोहोचलेच कसे? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मंदिर परिसरातील व्हीआयपी प्रोटोकॉल, चित्रीकरण आणि विशेष प्रवेशाबाबतची स्पष्ट व शासनमान्य नियमावली सार्वजनिक करावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा साईभक्त व स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

सुरक्षारक्षक काय करत होते?

संस्थानच्या संरक्षण विभागाची मुख्य जबाबदारी मंदिर परिसराची सुरक्षा आहे. परंतू कलाकार समाधीवर बसत असताना तेथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांनी रोखले का नाही?, चित्रीकरण करताना कोणताही मज्जाव न करणाऱ्या कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.

तसेच या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवून त्याची निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी मागणी साईभक्तांकडून करण्यात येत आहे. हा संपूर्ण प्रकार केवळ एका चित्रीकरणापुरता मर्यादित नसून, तो साईभक्तांच्या असीम श्रद्धेला गेलेला तडा असल्याचे मानले जाते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी पुढे आली आहे.

मंत्री विखे पाटलांकडून चौकशीचे आदेश

​श्री साईबाबा समाधी मंदिरात चित्रपट चित्रीकरणादरम्यान घडलेल्या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि साईभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करत प्रशासन, संस्थान अधिकारी, गावकऱ्यांची बैठक घेत यशस्वी तोडगा काढला. सुरक्षेत हलगर्जीपणा दाखविणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून चौकशीचे आदेश दिल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगताच वादावर तूर्तास पडदा पडला.

समाधी चौथऱ्यावर जाऊन बसत चित्रीकरण केल्याचा प्रकार समजताच शिर्डी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. श्री. साईबाबांच्या जीवनावर आधारित चित्रपट चित्रीकरणादरम्यान हा प्रकार घडला. भक्तांच्या श्रद्धेचा हा थेट अपमान असल्याचेा दावा करत मंदिर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गाकऱ्यांनी गर्दी केली. ​​

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस प्रशासन आणि स्थानिक गावकऱ्यांची तातडीने संयुक्त बैठक घेतली. समाधी मंदिरातील घडल्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून, सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाईचे आश्वासन देतानाच भविष्यात मंदिर परिसरात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT