Ashok Kharat Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat: शिर्डी पोलिसांच्या गुन्ह्याला बी समरी; नीरज जाधव प्रकरणात मोठा ट्विस्ट

नीरज जाधवविरोधातील शिर्डी पोलिस गुन्ह्यात ठोस पुरावे न मिळाल्याने बी समरी सादर करण्यात आली आहे. या प्रकरणात भोंदू अशोक खरातचा मोठा खुलासा समोर आला

पुढारी वृत्तसेवा

नगर: नीरज जाधव विरोधात शिर्डी पोलिसांत दाखल गुन्ह्याचा तपास आता फाईलबंद होण्याची चिन्हे आहेत. तपासात पोलिसांना ठोस पुरावे न मिळाल्याने न्यायालयात बी समरी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान याच गुन्ह्यात संशयित आरोपी करत शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरातची नाकाबंदी केल्याची ‌‘चाल‌’ही यानिमित्ताने समोर आली.

निरज जाधव हा भोंदू अशोक खरातचा ऑफिसबॉय म्हणून कार्यरत होता. त्याच्या विरोधात शिर्डीतील तरुणीने फिर्याद दिली होती. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत महत्प्रयासाने त्याला पकडले. त्यावेळी भोंदू खरातच्या काळ्या कृत्याचे बिंग फुटले. जाधवच्या माध्यमातून शिर्डी पोलिसांना ‌‘तो पेनड्राईव्ह‌’ मिळाला. त्यावेळी पोलिसांनी याच गुन्ह्यात भोंदू खरातलाही संशयित आरोपी केले.

आरोपी करताच लागोलाग ‌‘लूक आऊट‌’ नोटीस जारी केली. तो परदेशात पळून जावू नये, या त्यामागील उद्देश होता. पोलिसांची ही चाल यशस्वी झाली अन्‌‍ त्यामुळेच भोंदू अशोक खरातला नाशिकमधून बेड्या ठोकल्या गेल्या. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस उपधीक्षक अमोल भारती यांच्यासह पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्या टीमने भोंदू खरातच्या काळ्या कृत्याचा भांडाफोड केला.

दरम्यान, संबंधित तरुणीने दिलेल्या फिर्यादीच्या तपासात नीरज जाधव याच्याविरोधात पुरेसे पुरावे सापडले नाहीत. तसेच खरातला संशयित आरोपी करण्यामागचे खरे कारणही पुढे आले. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास बी समरी म्हणून पोलिसांनी राहाता न्यायालयासमोर सादर केला आहे. यामुळे या गुन्ह्याचा तपास आता फाईल बंद होण्याची चिन्हे आहेत.

फेक फिर्याद अन्‌‍ भोंदू खरातचा भांडाफोड

मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो दाखवून जाधव त्रास देत असल्याचा उल्लेख फिर्यादीत तरुणीने केला होता. याच फिर्यादीत शिर्डीतील गेट नंबर चारचा उल्लेख होता. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्ह्याचा बारकाईने तपास केल्यानंतर फिर्याद संशयास्पद वाटली. ज्या मोबाईल नंबरवरून फोटो पाठविले गेले तो अनेक दिवसांपासून बंद असल्याचे तपासात निदर्शनास आले. चार नंबर गेटचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा तो दावाही खोटा निघाला. एकूणच नीरज जाधवकडील ‌‘तो पेनड्राईव्ह‌’ मिळविण्यासाठी भोंदू खरातने त्या तरुणीला पुढे केल्याचे समोर आले. भोंदू खरातचे पलायनाचे मार्ग बंद करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी अत्यंत गोपनियता पाळत भोंदू खरातला संशयित आरोपी केले. त्यामुळेच तर तो नाशिक पोलिसांच्या हाती लागला, हे गुपीत बी समरीतून उघड होवू पाहत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT