Ashok Kharat Case  Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat: शिर्डी जमीन घोटाळ्यात भोंदू खरातचा अजब दावा; साडेपाच कोटींच्या व्यवहारावरून चौकशी तीव्र

फसवणूक प्रकरणात सावकारकी नाकारत साक्षीदारांवर आरोप; कल्पना खरात हायकोर्टात, तपास अधिकाऱ्यांच्या रजेने चर्चेला उधाण

पुढारी वृत्तसेवा

नगर: शिर्डीतील जमीन अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांनी दाखवली. जमीन खरेदीपोटी रावसाहेब गोंदकर यांना दिलेले साडेपाच कोटी स्वत:चे असल्याचे स्पष्टीकरण देतानाच साक्षीदारांनी संगनमताने गोत्यात आणल्याचा अजब दावा भोंदू अशोक खरातने केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिर्डीतील जमीन व्यवहाराच्या फसवणूक प्रकरणात अटकेतील भोंदू खरातची कसून चौकशी सुरू आहे. खरात याने शिर्डीतील साडेचार एकर जमीन अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांनीच दाखवली, त्यावेळी मूळ मालक रावसाहेब गोंदकर उपस्थित नव्हते. 5 कोटी 52 लाखांना तो व्यवहार ठरला. त्यानुसार रावसाहेब गोंदकर यांना पैसे दिले.

साठेखतावरील सह्याही मान्य आहेत. 22 ऑगस्ट 2023 चे मुख्यत्यार पत्र आणि 23 ऑगस्टचे 2023 चे खरेदीखत झाल्याचेही खरातने कबूल केले आहे. मात्र, खरेदी उलटून देण्याचे ठरले होते, व्याजाचा कोणताही विषय नव्हता, असे सांगून त्याने सावकारकीच्या व्यवहाराबाबत इन्कार केला. काही साक्षीदार एकत्र आले आणि मला गोत्यात आणले, असा अजब दावा खरातने केला आहे. पोलिस निरीक्षक रणजित गलांडे आणि उपनिरीक्षक निवांत जाधव हे खरातची चौकशी करत आहेत.

कल्पना खरात हायकोर्टात

शिर्डी पोलिसांत दाखल सावकारकी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी कल्पना खरातचा जामीन सेशन कोर्टाने फेटाळल्यानंतर तिने वकिलामार्फत हायकोर्टात धाव घेतली आहे. बुधवारी त्यावर सुनावणी झाली. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी यांनी हायकोर्टात तिच्या जामीन अर्जावर विरोध असल्याची बाजू मांडली. त्यावर न्यायालयाने 12 तारखेला पुढील सुनावणी ठेवली आहे.

डाळभात अन्‌‍ इंग्रजी

शिर्डीच्या तुरुंगात मुक्काम असलेल्या खरातची दिनचर्याही चर्चेचा विषय ठरली आहे. तो सकाळी 10 आणि सायंकाळी 5 वाजता जेवण करतो. डाळ-भात खाण्यावर त्याचा भर असल्याचे समजते. पोलिसांच्या चौकशीवेळी खरात हा काहीवेळा इंग्रजीत बोलत होता, अशीही माहिती पुढे येत आहे.

‘ते‌’ दोन अधिकारी रजेवर जाण्याचा ‌‘योग‌’

खरात फाईल्स ही खऱ्याअर्थाने शिर्डी पोलिसांनी बाहेर काढली. विशेषतः अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भूमिका महत्वाची ठरली होती. त्यांना अडचणीत आणण्याचाही पुरेपूर प ्रयत्न झाला होता. आता खरात हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा वाघचौरे हे उलगडा करण्याची शक्यता होती. मात्र याच कालावधीत वाघचौरे हे रजेवर असल्याने हा योगायोग, की पुन्हा दबावाचा प्रयोग, याविषयी चर्चा सुरू आहेत. एवढेच नाही तर समता पतसंस्थेच्या बनावट खात्यांची तपासणी करण्याचे उपनिबंधक मंगेश सुरवसे यांना आदेश दिले आहेत, मात्र, ते देखील रजेवर आहेत. हे दोन्ही अधिकारी रजेवर गेल्याने, तपास थंडावल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT