https://www.youtube.com/watch?v=o0u3D6QPGL4शिर्डी : गुरुपौर्णिमा उत्सवाला शिर्डीत बुधवारी मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. या उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व गावात सर्वत्र करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मंदिर व परिसराला मुंबईच्या आनंद साईराज ट्रेडर्स यांच्या देणगीतून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. (Ahilyanagar News Update)
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बुधवारी पहाटे काकड आरती झाली. संस्थानाचे मुख्य अधिकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांनी श्रींची पाद्यपूजा केली. श्रींची प्रतिमा, पोथी व वीणेची मिरवणूक काढण्यात आली. त्यात गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी वीणा, तसेच साईआश्रम भक्तनिवासाचे प्र.अधीक्षक विजय वाणी व प्र. उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी प्रतिमा हाती घेतल्या होत्या. संस्थानचे मंदिर अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, पुजारी, कर्मचारी, साईभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यावर तेथे श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ गाडीलकर यांनी केला.
गुरुपौर्णिमेनिमित्त आजच्या मुख्य दिवशी (गुरुवारी) शिर्डीत दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री श्रींच्या रथाची मिरवणूक निघणार आहे. साई समादी मंदिर भाविकांना दर्शनासाठी आज रात्रभर खुले राहणार असल्याचे संस्थानातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे शेजारती व शुक्रवारी (दि. 11) पहाटे श्रींची काकड आरती होणार नाही. गुरुवारी रात्री 10.00 ते शुक्रवारी पहाटे 05.00 वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होणारे आहेत. अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिरही रात्रभर उघडे आहे.