प्रारूप आराखड्याने शिर्डीत इच्छुक अस्वस्थ Pudhari
अहिल्यानगर

Shirdi News: प्रारूप आराखड्याने शिर्डीत इच्छुक अस्वस्थ

अभय शेळके, कैलासबापू कोते, गोंदकरांची नगराध्यक्षपदाची तयारी

पुढारी वृत्तसेवा

शिर्डी: वार्डाची प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर शिर्डीत मोठी तोडफोड झाल्याचे समोर आले. महायुतीकडून अभय शेळके, कैलासबापू कोते, शिवाजी गोदकर आणि दत्तात्रय कोते यांनी आतापासूनच तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. दरम्यान नवी प्रारूप प्रभाग रचना महाविकास आघाडीसाठी तारेवरची कसरत असल्याचे दिसते.

शिर्डी नगर परिषद झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. नगरपरिषदेची निवडणूक होणार असल्याचा अंदाज बांधत इच्छुकांनी जुन्या प्रभागात संपर्क वाढविला, मात्र नव्या रचनेत सगळ्याची वार्डांची तोडफोड होवून दोन/तीन प्रभागात विखुरले गेले. त्यामुळे इच्छुकांनी अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. (Latest Ahilyanagar News)

गतवेळी 2017 साली निवडणूक झाली त्यावेळी शिर्डीला नगरपंचायत होती. त्या निवडणुकीत विखे गटाने 17 पैंकी 10 जागा जिंकून सत्ता हस्तगत केली होती. भाजपला तीन, अपक्ष दोन, आणि शिवसेना 1, मनसे 1 जागा असे बलाबल होते. यंदाच्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपामध्ये तर शिवसेना, राष्ट्रवादी दोन गटात विभागली आहे.

या बदलत्या राजकीय समीकरणानंतर शिवसेनेचे कमलाकर कोते, विजय जगताप महायुतीमध्ये आहेत. विखे समर्थक राजेंद्र गोंदकर, शिवाजी गोंदकर यांच्यामुळे महायुतीचे पारडे जड मानले जाते. काँग्रेसचे नेते डॉ.एकनाथ गोंदकर, उबाठाचे संजय शिंदे, सचिन कोते हे महाविकास आघाडीचे नेते आहेत.

शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी या मित्रपक्षांना जागा वाटपात सामावून घ्यावे लागणार असल्याने भाजपकडून उमेदवारी देताना विखे पाटलांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. इच्छुकांना ऐनवेळी उमेदवारी नाकारली गेली तर त्यांची नाराजी भाजपला ओढावून घ्यावी लागेल.

तसेच नव्या जुन्यांचा मेळ घालण्याचे आवाहन भाजपसमोर अर्थात विखे पाटलांसमोर असेल. नगर परिषदेत त्याच त्या चेहर्‍याबाबत शिर्डीकरांमध्ये नाराजीची भावना असल्याचे जाणवते. त्यामुळे अनेक ठिकाणी नवीन चेहरे दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

माजी नगराध्यक्ष अभय शेळके, कैलास बापू कोते आणि शिवाजी गोंदकर हे दिग्गज नेते पुन्हा एकदा भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे दावेदार मानले जात असून तशी तयारी त्यांनी सुरू केल्याचे सांगण्यात येते. अर्थात नगराध्यक्ष पदाचे आरक्षण पडणे अजून बाकी आहे. त्यानंतरच नगराध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी सुरू होईल.

प्रभाग रचना जाहीर होण्याचा पहिला टप्पा झाला, अजून आरक्षणाचा दुसरा टप्पा होणे बाकी असल्याने त्यानंतरच राजकीय हालचालींना खर्‍या अर्थाने वेग येण्याची चिन्हे असली तरी आतापासूनच इच्छुकांनी चाचपणी सुरू केली आहे.

विखे पाटलांचा वरदहस्त हवा!

आजमितीची राजकीय परिस्थिती पाहिली तर महायुतीचे पारडे शिर्डीत वरचढ असल्याचे दिसते. त्यामुळे इच्छुकांचे पाय महायुतीकडे ओढताना दिसतात. महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांना मंत्री विखे पाटील व विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांचा वरदहस्त असला पाहिजे. विखे पिता-पुत्र कोणाच्या डोक्यावर हात ठेवतात? हे आगामी कळेल, तोपर्यंत सगळेच इच्छुक तयारीला लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT