कोपरगाव : विधानसभा मतदारसंघातील काकडी येथील शिर्डी विमानतळावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी, या मागणीसाठी युवकांनी व ग्रामस्थांनी विमानतळाच्या गेटसमोर उपोषण सुरू केले होते. (Latest Ahilyanagar News)
या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय येथे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानतळ प्रशासनाशी चर्चा करून प्रश्न सोडवला. विमानतळासाठी ठेकेदारी पद्धतीने काढलेले टेंडर रद्द करण्यात आले आहे.
काकडी येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शेतकऱ्यांची जमीन वाटाघाटीने घेतली होती. त्यावेळी कंपनीने स्थानिकांना नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरीसाठी आवश्यक पात्रता मिळवली. मात्र पात्रता असूनही त्यांना नोकरी देण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता.
दरम्यान, स्थानिकांच्या नोकऱ्यांसाठी स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी दि. 27 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मुलांना विमानतळ प्राधिकरणामार्फत नोकरी देण्याची मागणी केली. या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत विमानतळ प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर हा प्रश्न सुटला असून, ग्रामस्थांनीही उपोषण मागे घेतले होते.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि कोल्हे यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद ठरला असून ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.