चिचोंडी शिराळ : पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव येथील गावाचा एकमेव तलाव काही खासगी व्यक्ती जेसीबीद्वारे खोदकाम करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदरचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी पाथर्डीचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जलसंधारण विभाग व ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन दिले आहे.
शिंगवे केशव गावाच्या पश्चिमेकडील ओढ्यावर गट क्रमांक 1, 9, 10 व 409 मध्ये सन 1986-87 दरम्यान जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांच्या संमतीने तलावाची उभारणी केली होती.
या तलावासाठी कोणतेही भूसंपादन झालेले नसले तरी, शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या सहमतीने हा तलाव उभारण्यात आला होता. मात्र, 2018 मध्ये गट नं. 409 मधील काही क्षेत्र खरेदी करून खासगी व्यावसायिकाने तलाव नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
सदर व्यक्तीने क्षेत्र खरेदीपूर्वीच तलाव, ओढा, दगडी सांडवा, भरावाचे दगडी अस्तरीकरण पाहूनच जमीन घेतली होती. असे असतानाही तलावाचा माती भराव, दगडी सांडवा भिंत व अस्तरीकरणाचे नुकसान जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी वारंवार समजावून सांगूनही संबंधितांकडून काम थांबवले गेले नाही.
मागील आठवड्यात संबंधित व्यक्तीने जे.सी.बी. मशीनच्या साह्याने माती भरावालगत नाली खोदण्याचे बेकायदेशीर काम सुरू केले. या नालीमुळे तलावात पाणी साठण्याऐवजी ते थेट सांडव्यातून बाहेर वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, मागील महिन्यातच सुमारे 500 फूट ओढा सपाट करून जवळपास एक एकर क्षेत्रावर अतिक्रमण करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शिंगवे शिवारात हा एकमेव तलाव असून, तो वांबोरी पाईप चारी योजनेत समाविष्ट आहे.लवकरच वांबोरी चारीचे पाणी सुरू होणार असून, गावातील बहुतांश शेती याच तलावावर अवलंबून आहे. अशा स्थितीत तलाव उद्ध्वस्त झाल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत अवैध व नियमबाह्य नाली खोदकाम त्वरित बंद करावे, दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा दिला आहे.