शेवगाव: शेवगाव नगरपरिषदेतील शिवसेना गटाच्या गटनेतेपदावरून सुरू असलेल्या वादावर अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने निकाल दिला आहे. गटनेतेपदी अमर दिलीपराव पुरनाळे यांची निवड वैध ठरविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यमान गटनेत्या तथा नगराध्यक्षा माया अरुण मुंढे यांना धक्का बसला आहे.
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या चार नगरसेवकांच्या गटाची जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करण्यात आली होती. त्यावेळी माया मुंढे यांची गटनेत्या म्हणून निवड झाली होती.
मात्र, त्या गटातील अन्य तीन नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याचा, गटाच्या बैठका घेत नसल्याचा आणि मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत गटनेते बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या ७ सप्टेंबरला गटाची सभा घेण्यात आली.
या सभेत माया मुंढे यांना गटनेतेपदावरून दूर करून त्यांच्या जागी अमर पुरनाळे यांची निवड करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याचे अर्जदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेल्या अर्जात नमूद केले होते.
या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात ३० ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान सदस्यांची ओळख परेड घेण्यात आली. चार सदस्यांपैकी दोन सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होते, तर एका महिला नगरसेवक उपस्थित राहू न शकलेल्या एका महिला सदस्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी करून घेण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः ओळख परेड व बहुमताची खातरजमा केली. यामध्ये चारपैकी तीन नगरसेवकांचे बहुमत गटनेता बदलण्याच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम १९८७ अन्वये सादर कागदपत्रे, सभेचा ठराव आणि बहुमत विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अमर पुरनाळे यांची गटनेतेपदी झालेली निवड वैध ठरवली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे शेवगाव नगरपरिषदेतील शिवसेना गटाच्या नेतृत्वात बदल झाला असून, नगरपरिषदेच्या आगामी राजकीय घडामोडींमध्ये या निर्णयाचे महत्त्व वाढले आहे.