बोधेगाव: शेवगाव तालुक्यात गुन्हेगारीने अक्षरशः डोके वर काढले असून, जुगार, मटका, अवैध दारू, वाळू तस्करीसारखे अवैध धंदे खुलेआम फोफावत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, या सर्व प्रकारांकडे पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे भविष्यात मोठे टोळी युद्ध भडकण्याची भीतीही व्यक्त केली जात असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज गाव तिथे जुगार-मटका अवैध दारू अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. देशी-विदेशी दारूविक्री, मटका, जुगार, बिंगो-चक्री, अवैध वाळूउपसा, चोरी, दरोडे, रस्ता लूट, खुनाचे प्रयत्न अशा गंभीर घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अवैध व्यवसाय अनेक ठिकाणी राजरोसपणे सुरू असून त्यांच्यावर पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बोधेगाव परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून जबरी चोऱ्या आणि दरोड्यांच्या अनेक घटना घडल्या. लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. मात्र, यातील एकाही प्रकरणाचा अद्याप उलगडा झाला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नेवास पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाच्या घरीच जबरी चोरी झाली. त्या वेळी त्यांच्या वडिलांना निर्दयी मारहाण करण्यात आली होती. एवढी गंभीर घटना घडूनही आजतागायत त्या प्रकरणाचा तपास लागला नाही, ही बाब अधिक धक्कादायक मानली जात आहे. नागलवाडी येथे सेवानिवृत्त शिक्षक राम गिते यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
या घटनेलाही बराच कालावधी उलटून गेला असला तरी पोलिसांच्या हाती कोणतेही ठोस धागेदोरे लागलेले नाहीत. तालुक्यातील नागरिकांच्या मते, शेवगाव पोलिस अधिकाऱ्यांचा गुन्हेगारांवर कोणताही वचक उरलेला नसल्याची चर्चा आहे. उलट काही अवैध व्यवसायिकांसोबत पोलिसांची उठबस सुरू असल्याचेही बोलले जात असून मोठे साटेलोटे असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालून शेवगाव पोलिस ठाण्याच्या कारभाराची सखोल चौकशी करावी व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
गुन्ह्यांचा होईना उलगडा
शेवगाव पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल होतात; मात्र त्यांच्या तपासाचा वेग अत्यंत मंद असल्याचे दिसून येत आहे. गुन्हे नोंदवले जातात. परंतु त्यांचा उलगडा होत नसल्याने पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
रात्रीची वसुली मोहीम चर्चेत
दरम्यान, पोलिस उपअधीक्षक व पोलिस निरीक्षकांच्या मर्जीतील काही ठराविक कर्मचाऱ्यांकडून रात्री-अपरात्री वसुली मोहीम राबविली जात असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. या वसुलीसाठी काही कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचेही बोलले जात आहे. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.