सोनई : श्री शनैश्वर देवस्थानचे प्रशासकीय कार्यालये प्रशासक तथा जिल्हाधिकाऱ्यांनी सील केले होते. त्यावर न्यायालयाने 10 नोव्हेंबरपर्यंत ‘जैसे थे’ चा निकाल दिला असतानाही कार्यकारी समितीने काही विभागाचे सील काढले. त्यामुळे विश्वस्त मंडळ याप्रकरणी पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे समजते.(Latest Ahilyanagar News)
श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ राज्य सरकारने बरखास्त करून जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थानची सर्व कार्यालये सील केली. राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात विश्वस्त मंडळांनी संभाजीनगर खंडपीठात अपील केले. न्यायालयाने यावर जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थानचा कारभार पाहण्यासाठी 11 जणांची कार्यकारी समिती स्थापन केली. बुधवारी प्रशासकांच्या आदेशाने कार्यकारी समितीने काही विभागांचे सील काढले. आता या निर्णयामुळे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी विश्वस्त मंडळ अपिल करण्याच्या तयारीत आहे.
या कार्यालयातून कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी सील काढल्याचे कारण कार्यकारी समितीने सांगितले. आता कर्मचाऱ्यांना पगार व बोनस किती मिळणार, या कडे कर्मचारी आस लावून बसले आहेत. या कार्यालयात महत्वाची कागदपत्रे असल्याने कागदपत्रे गहाळ झाली तर त्याची जबाबदारी कुणाची? दैनंदिन कारभारासाठी गरजेच्या वस्तू खरेदी करणार का? दिवाळीला मंदिर परिसरात दरवर्षी प्रमाणे सजावट होणार का? लक्ष्मीपूजन होणार का? होणार असेल तर कोण करणार?भाविकांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करुन देणे व त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी कोण घेणार? यासह अनेक प्रश्न उपस्थित होणार आहे.