School leaving certificate Ahilyanagar
नेवासा : शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी पालकांची अडवणूक करणार्या आणि अवाजवी फी मागणी केली, म्हणून तक्रार करणार्या तक्रारदारालाच दमदाटी करण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या कुकाणा शाळेत घडला आहे. शिक्षकासंबंधी केलेल्या पालकांच्या तक्रारीवर आता तालुका शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली आहे. पालकांच्या तक्रारीवर तक्रारदारावरच दबाव आणण्याचा गंभीर प्रकार झाल्याचीही दुसरी तक्रार आहे.
एका पालकाने शाळा सोडल्याचा दाखला व निर्गम उतारा मागताना या शाळेत अडवणूक केली जाते, अवाजवी पैसे मागितले जातात अशी तक्रार शिक्षण विभागाकडे केली. त्यावर या शाळेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे व दिरंगाई होत असल्याचे दिसताच माहिती अधिकाराखाली अर्ज टाकून विचारणा केली असता या शाळेतील संबंधितांकडून तक्रारदार पालकावरच दबाव आणण्यात आला. तसा तक्रारीत उल्लेखही आहे. विशेष म्हणजे तक्रारदाराचा शिक्षण विभागाकडे आलेला अर्ज केंद्रप्रमुख व संबंधित शिक्षकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला व शासकीय गोपनीयतेचा भंग केला अशीही पालकाची तक्रार आहे. तसेच शिक्षकांच्या घरभाडे भत्ता व मुख्यालय या विषयीही पालकांच्या तक्रारीवर उत्तर देण्याऐवजी पालकांना दमबाजी करण्याचा प्रकार सुरू असल्याचेही पालकाचे म्हणणे आहे. या सर्व प्रकारावर शिक्षण विभागाकडून संबंधितांची चौकशी सुरू झाली असून, विस्तार अधिकारी या प्रकाराची चौकशी करत आहेत. कुकाणा प्राथमिक शाळेतील या प्रकाराने पालकांत संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पालकांतून होत आहे. शिक्षण विभागातील तक्रारीचे कागदपत्र शिक्षकांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करावी, अशीही मागणी पालकांनी केली आहे. नेमके कोण कोण शिक्षक यास जबाबदार आहेत त्यांच्यावर सविस्तर चौकशी करून जबाबदार असतील तर कारवाई करावी, अशी पालकांची मागणी आहे.
शिक्षण विभागातील एका महिला विस्तार अधिकार्याची चौकशीसाठी नेमणूक करण्यात आली असून, त्या या प्रकरणी सखोल चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहेत. त्यामुळे सुरुवातीला तक्रारदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणारे आता तक्रारदार पालकांची विनवणी करू लागले आहेत. मात्र, तक्रारदार पालक ठाम असल्यामुळे या चौकशीतून सत्य उजेडात येणार आहे.