चंदनापुरी घाटात स्कूल बस उलटून सहा विद्यार्थी जखमी Pudhari
अहिल्यानगर

School Bus Accident: चंदनापुरी घाटात स्कूल बस उलटून सहा विद्यार्थी जखमी

चंदनेश्वर विद्यालयाची बस उलटून झालेल्या अपघातात सहा विद्यार्थी जखमी झाले.

पुढारी वृत्तसेवा

Chandanapuri Ghat Accident

संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर तालुक्यातील चंदनापुरी घाट शुक्रवारी (दि.5) सकाळी चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयाची बस उलटून झालेल्या अपघातात सहा विद्यार्थी जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदनेश्वर विद्यालयाची बस साकूर आणि परिसरातून 35 हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन सकाळी चंदनापुरी घाटातून शाळेकडे येत होती. पुणे-नाशिक महामार्गावर घाट परिसरात सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. ही स्कूल बस घाटात आली असताना समोरून आलेल्या एका वाहनाने हुलकावणी दिल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली. (Latest Ahilyanagar News)

अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, हवालदार अमित महाजन व डोळासने महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमी विद्यार्थ्यांना चंदनापुरी घाटातील गुंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली.

दरम्यान, या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बसच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत आणण्यासाठी बसचा वापर होतो. मात्र या स्कूल बस नियम आणि अटींचे पालन करतात का, याबाबत अनेकदा शंका उपस्थित होते.

सद्यःस्थितीत अनेक स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरले जातात, तसेच वाहनांच्या देखभालीसंदर्भातही प्रश्नचिन्ह निर्माण होते. प्रादेशिक परिवहन विभागाने विद्यार्थी वाहतूक करणार्‍या सर्व बसची कसून तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत पालक व्यक्त करत होते.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना तातडीने मदतीच्या सूचना दिल्या. थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, विजय राहणे, इंद्रजित खेमनर, सरपंच भाऊराव रहाणे, बाळासाहेब सागर, किरण राहणे, बालमशेठ सरोदे, आनंदराव कडणे, बाळू सरोदे, संदीप सरोदे, दिनकर भालेराव आदींनी घाटातील रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. यावेळी मुख्याध्यापक, तालुका पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे उपस्थित होते.

आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलमताई खताळ, शिवसेनेचे रामभाऊ रहाणे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहणे, किरण भागवत, किसन सरोदे, आनंदराव कढणे, सेक्रेटरी अनिल कढणे, रामदास पर्बंत, अशोक खेमनर यांनीही रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT