

ZP election preparation 2025
नगर: जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभागरचना 14 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासाठी प्रभागरचनेच्या कामाची धामधूम सुरु असून, तहसील स्तरावर आतापर्यत झालेल्या प्रभागरचनेच्या कामाची प्राथमिक तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असून, आहे.
जिल्हा परिषदेच्या 75 गट आणि चौदा पंचायत समित्यांच्या 150 गणांची 2011 ची लोकसंख्या गृहीत धरीत प्रभागरचना करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय समिती नियुक्त केलेली आहे. याशिवाय प्रत्येक तालुकास्तरावर देखील समिती कार्यरत आहेत. (Latest Ahilyanagar News)
गट आणि गणांची प्रारुप प्रभागरचना 14 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार प्रभागरचनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील तालुकास्तरीय समितीने तयार केलेल्या प्रभागरचनेची तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक स्वरूपात झाली. गट व गणांचे क्रमांक, त्यांची लोकसंख्या, नकाशाची दिशा योग्य पद्धतीने फिरते का अशा विविध बाबीची तपासणी करण्यात आली आहे.
अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, अहिल्यानगर, शेवगाव, पाथर्डी, नेवासा व श्रीगोंदा या दहा तालुक्यांच्या प्रभागरचनेची तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित कर्जत, जामखेड, पारनेर व कोपरगाव या चार तालुक्यांची तपासणी प्रक्रिया दोन-तीन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 14 जुलै 2025 पर्यंत गट आणि गणांची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध होऊन त्यावर 21 जुलैपर्यंत हरकती मागविल्या जाणार आहेत.