नेवासा: तालुक्यातील वडुले येथील शेतकरी आत्महत्येप्रकरणी कुकाणा बसथांब्यावर नेवासा-शेवगाव मार्गांवर वंचित बहुजन आघाडी, लहुजी सेनेंच्या पुढाकारातून सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. पोपट सरोदे यांनी प्रास्ताविक केले.
वडुले येथील शेतकरी बाबासाहेब सरोदे यांनी गेल्या रविवारी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. गावकर्यांनी गावात गुरुवारी निषेध सभा घेतल्यानंतर रविवारी (दि.24) सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन केले. (Latest Ahilyanagar News)
वंचित बहुजन आघाडीचे नेते किसन चव्हाण, तालुकध्यक्ष पोपट सरोदे, विजय गायकवाड, काँग्रेसचे संभाजी माळवदे, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक देसाई देशमुख, लहुजी सेनेचे भैरवनाथ भारस्कर, एकलव्य संघटना अध्यक्ष अनिल जाधव, शंकरराव भारस्कर, अशोक गर्जे आदींची यावेळी भाषणे झाली.
शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले, मच्छिंद्र आर्ले, बाबासाहेब खराडे, दिनकर गर्जे, बाबासाहेब आल्हाट, नितीन गोर्डे आदी यावेळी उपस्थित होते.
साखर कारखानदार आत्महत्या करीत नाहीत. कारण कोणतेही सरकार आले तरी त्यांना पाँकेज मिळत असते. सरकारच्या विरोधात भविष्यात सर्वाना एकत्र लढा द्यावा लागेल, असे वंचितचे किसन चव्हाण यांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक महेश पाटील, मंडलाधिकारी तृप्ती साळवे यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले. नेवासा शेवगाव मार्गांवर तासभर वाहतूक यावेळी ठप्प झाली होती. उपनिरीक्षक मनोज अहिरे यांनी बंदोबस्त ठेवला.