Crime Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Saraf Shop Threat: सराफ दुकानात घुसून कामगारास धमकी; शटर ओढून आत कोंडले

टाकळीभान येथील तिघांविरुद्ध श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: सराफाच्या दुकानात घुसून तिघाजणांनी कामगारास धमकावून, दुकानाचे शटर ओढून त्याला आत कोंडले. दुकान मालकाला मोबाईल कॉल करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील टाकळीभान येथे ही सिनेस्टाईल घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराफ व्यावसायिक ओम सचिन महाले यांच्या मालकीची श्रीरामपूर, टाकळीभान, लोणी, पुणतांबा व राहाता येथे सोन्याच्या दागिन्यांची दुकाने आहेत. दुकांनांमध्ये कामगार कार्यरत असतात. टाकळीभान येथील पोपट भगीरथ महाले या दुकानात संजय शिवाजी सोनार (रा. रांजणखोल, ता. राहाता) हे काम पाहतात.

गुरुवारी सकाळी कामगार संजय सोनार यांनी, दुकान मालक ओम महाले यांना कॉल करून, सांगितले की, मयुर अशोक पटारे (30), राजू संजय रन्नवरे (30) व बंटी भालेराव (सर्व रा. टाकळीभान) यांनी, दुकानात येऊन वाद करण्यास सुरुवात केली. मयुर पटारे याने स्वतः टाकळीभान ग्रामपंचायतीचा सदस्य असल्याचे सांगत, ‌‘रुपेश भारत भालेराव याची तारण ठेवलेली वस्तू द्या. दुकानाची कागदपत्रे दाखवा. मालकाला बोलवा,‌’ अशी मागणी केली. यावर कामगाराने, ‌‘दुकानाची कागदपत्रे मालकाकडे असल्याचे सांगितले. याचा राग आल्यामुळे ‌‘तुमचा धंदाच बंद करू,‌’ अशी धमकी देत, जबरदस्तीने दुकानाचे शटर ओढून, संजय सोनार यांना दुकानाच्या आत कोंडले.

काही वेळेनंतर गावातील नागरिकांनी बिकट परिस्थिती पाहून शटर उघडले. यानंतर सदर तिघेजण पुन्हा दुकानात आले. ‌‘शटर कोणी उघडले?‌’ असा संताप व्यक्त करीत, त्यांनी शिविगाळ करीत, जीवे मारण्याची धमकी दिली. ही माहिती संजय सोनार यांनी, त्वरित मालक ओम महाले यांना कॉल करून दिली. ओम महाले यांनी, श्रीरामपुरमधील स्वतःच्या ऑफिसमधून दुकानातील लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज तपासले. घाबरलेल्या स्थितीत त्यांनी, श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशन गाठले. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी तक्रार देण्यासाठी कामगारास बोलावले, मात्र तो घाबरलेल्या अवस्थेत होता. याप्रकरणी दुकान मालक ओम महाले यांनी, श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी मयुर अशोक पटारे (30), राजू संजय रणनवरे (30) व बंटी भालेराव (सर्व रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिनकुमार बैसाने करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT