Sanjeevani Par Pudhari
अहिल्यानगर

Kopargaon Sanjeevani Par: संजीवनी पार नव्या तेजात उजळला; महाशिवरात्रीला लोकार्पण सोहळा

बेट-कोपरगाव येथे भव्य सुशोभीकरण, मार्बल मूर्ती व गूढ भुयारामुळे भाविकांमध्ये उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

कोपरगाव: दक्षिणगंगा गोदावरीच्या पावन तीरावर वसलेले, कोपरगावजवळील बेट भागातील पुरातन, पौराणिक आणि धार्मिक वारसा लाभलेले ‌‘संजीवनी पार‌’ आज नव्या तेजाने उजळून निघाले आहे. संजीवनी मंत्राने पावन झालेल्या या ऐतिहासिक स्थळाला जणू नवी ‌‘संजीवनी‌’च प्राप्त झाली आहे. भव्य सुशोभीकरण, आकर्षक रंगरंगोटी, सुदृढ वॉल कंपाऊंड, आकर्षक दिवे आणि निसर्गरम्य लँडस्केपिंगमुळे परिसराचे रूप अक्षरशः पालटले असून, अध्यात्मिकतेला सौंदर्याची देखणी चौकट लाभली आहे.

याबाबत माहिती देताना कोपरगाव बेट देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड म्हणाले, महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गुरुवार दि. 12 रोजी साधू संतांच्या हस्ते या नव्याने साकारलेल्या परिसराचा लोकार्पण सोहळा होणार असून, भाविकांसाठी तो विशेष उत्सवाचा क्षण ठरणार आहे.

काय आहे पौराणिक महात्म्य?

नगर-मनमाड मार्गावर, शिर्डीपासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर वसलेले श्री क्षेत्र बेट-कोपरगाव हे शुक्राचार्य महाराजांच्या तपश्चर्येने पावन झालेले तीर्थक्षेत्र आहे. जगातील एकमेव असे हे मंदिर मानले जाते की, येथे विवाह किंवा कोणतेही शुभकार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. पूर्वी दंडकारण्याचा भाग असलेला हा परिसर चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला टापूसदृश प्रदेश होता. भृगुवंशीय शुक्राचार्यांनी येथे कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांच्या कृपेने दुर्मिळ संजीवनी विद्या प्राप्त केली, अशी पुराणकथा सांगितली जाते. देव-दानव युद्धकाळात कचदेव, देवयानी आणि शुक्राचार्य यांची अमर कथा याच भूमीत घडली.

नंदी घर, सेल्फी पॉईंटचेही आकर्षण

संगमरवरी मार्बलची भव्यता, नैसर्गिक दगडांच्या स्लेट रचना, आकर्षक पेव्हिंग ब्लॉक्स, मजबूत रेलिंग, सुबक रंगकाम आणि दिमाखदार विद्युत रोषणाई यामुळे परिसर दैदिप्यमान झाला आहे. कलात्मक लोखंडी दरवाजे, दोन भव्य स्वागत कमानी, नंदी महाराजांसाठी सुसज्ज ‌‘नंदी घर‌’, दोन गजराजांच्या मूर्ती, भाविकांसाठी आरामदायी बेंचेस, गुरु शुक्राचार्यांची तेजस्वी प्रतिमा, कचदेव देवयानी यांचा सेल्फी पॉईंट, चार पुरातन समाध्या, तसेच वाहनस्वरूप सात फूट उंच सफेद घोड्याचा पुतळा, या सर्वांमुळे ‌‘पार‌’ परिसराचे आकर्षण वाढले आहे.

जयपूरहून आणले खास मार्बल

खास जयपूरहून आणलेल्या कार्तिकस्वामींच्या मकराना मार्बल मूर्तीची स्थापना करण्यात आली असून, विष्णू मंदिरास नव्याने कळस बसवून संपूर्ण वॉटरप्रूफिंग व पॉलिशिंग करण्यात आले आहे. बगीच्यात लॉन, तब्बल पंधराशे विविध प्रकारची वृक्षारोपण करून हिरवाईची समृद्ध चादर पसरविण्यात आली आहे. अवघ्या दोन महिन्यांत हे सर्व काम पूर्णत्वास गेल्याने परिसराने जणू नवी कात टाकल्याचे चित्र दिसते.

विष्णू मंदिराखालील गूढ भुयार

भगवान श्री विष्णू मंदिराच्या खाली असलेले प्राचीन भुयार नव्याने उघडे करून ठेवण्यात आले आहे. हे भुयार गोदावरी नदीखालून गेलेले असल्याची स्थानिकांची समजूत आहे. या गूढ वास्तूमुळे परिसराच्या ऐतिहासिक आणि पौराणिक कुतूहलात अधिकच भर पडली आहे. हजारो वर्षांची पौराणिक परंपरा, गुरु-शिष्य परंपरेचे तेज आणि गोदावरीकाठची पावन भूमी यांमुळे श्री क्षेत्र बेट-कोपरगाव - परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर हे भाविकांसाठी अपूर्व श्रद्धास्थान ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT