संगमनेरः अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या परिसरात काश्मीर ट्युलीप गार्डन प्रत्यक्षात बहरले आहे. या अनोख्या उपक्रमामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष संगमनेरकडे वेधले आहे. हा अभिनव व धाडसी प्रयोग माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारला आहे.
ट्युलीप फुले काश्मीर खोऱ्यात फुलतात. ट्युलीप गार्डन हेच याचे प्रमुख उदाहरण मानले जाते. दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल कालावधीत लाखो पर्यटक काश्मीरला भेट देतात. हीच अनोखी संकल्पना महाराष्ट्रात, अहिल्यानगर जिल्ह्यासारख्या तुलनेने उष्ण हवामानाच्या भागात प्रत्यक्षात साकारण्यात आली आहे. माजी मंत्री थोरात यांच्या दूरदृष्टी, चिकाटी व कृषी विषयक अनुभवाच्या जोरावर हे आव्हान यशस्वीरित्या पेलण्यात आले आहे.
कृषी महाविद्यालय केवळ शिक्षण देणारे केंद्र न राहता, नव-नवीन प्रयोगांसह संशोधनाचे ते केंद्र बनले पाहिजे. याच भूमिकेतून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या फुल शेतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, ही उदात्त भावना यामागे आहे. वेगवेगळ्या 8 जातींचे बहरले ट्युलीप्स गार्डनसाठी हॉलंड येथून उच्च प्रतीचे ट्युलीप कंद आयात करण्यात आले. तज्ज्ञ कृषी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तापमान, मातीचा प्रकार, पाणी व्यवस्थापन व खतांचे नियोजन करण्यात आले. दीर्घकाळ मेहनतीनंतर गुलाबी, पांढरे, पिवळे, लाल, जांभळे व नारंगी रंगांचे मनमोहक, सुंदर असे तब्बल 8 वेगवेगळ्या जातींचे ट्युलीप्स आता पूर्णतः बहरले आहेत.
काश्मीरमध्ये आल्याचा प्रत्यय!
ट्युलीप गार्डनमध्ये प्रवेश करताच, रंगीबेरंगी फुलांची लक्ष्यवेधी रांग, आल्हाददायी वातावरण व सुगंधाने भरलेली हवा अक्षरशः मन मोहून टाकते. आपण जणू काश्मीरमध्येच आलो की काय, असा प्रत्यय व्यक्त होत आहे. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण, संशोधन व प्रात्यक्षिकासाठी हे गार्डन उपयुक्त ठरणार आहे. ट्युलीप गार्डनमुळे संगमनेर तालुक्याला कृषी पर्यटनाचा नवा चेहरा मिळत आहे.
‘ट्युलीप गार्डन.. सुंदर संगम..!’
माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले ट्युलीप गार्डन म्हणजे कृषी, संशोधन, शिक्षण व पर्यटनाचा सुंदर संगम आहे. महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात हा प्रयोग मैलाचा दगड ठरणार आहे, असे गौरवोद्गार भेट देणारे पुष्पप्रेमी ऐकवत आहेत, ही बाब विशेष उल्लेखनिय!