नगर/संगमनेर: ‘तुम्हाला वाळू वाहतूक करायची असेल तर मला तीस हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुमच्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याबाबत कारवाई करेल, कारवाई टाळायची असेल तर तीस हजार रुपये द्यावे लागतील, अशाप्रकारे लाचेची मागणी करणारा संगमनेर तालुक्यातील कनोलीचा तलाठी काल तडजोडीनंतर 25 हजार घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला.
संतोष बाबासाहेब शेलार असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराच्या गावात घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार मोफत पाच ब्रास वाळू वाटप सुरू करण्यास तहसीलदारांनी मंजुरी दिलेली आहे. ग्रामपंचायत पातळीवर वाळू वाहतुकीसाठी पाच ट्रॅक्टर वाहनांना व वाळू उपसा करण्यासाठी एक जेसीबी व एक फरांडी ट्रॅक्टरला मंजुरी मिळाली आहे. (Latest Ahilyanagar News)
तक्रारदार व त्यांचे मित्र त्यांच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करीत असताना तलाठी संतोष शेलार यांनी वाळू वाहतूक करायची असेल तर तीस हजार दयावे लागतील, अशी मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपतकडे धाव घेतली. शेलार यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडअंती 25 हजार लाचेची मागणी केली. शेलार यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
आरोपीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक छाया देवरे यांनी केली. कारवाईत पोलिस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, पोलिस नाईक चंद्रकांत काळे, पोलिस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, चालक पोलिस हवालदार हारून शेख आदींचे पथक सहभागी होते.