संगमनेर: संगमनेर शहरातील सुरू असणार्या कत्तलखान्याबाबत संगमनेरचे पोलिस उप अधीक्षक व शहर पोलिस निरीक्षकांनी शासनाला दिलेली माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे संबंधितांना निलंबित करावे, अशी गृहमंत्र्यांकडे मागणी करताना आमदार अमोल खताळ यांनी कत्तलखान्यांवर लक्षवेधी मांडली.
संगमनेर शहर व तालुक्यात राजेरोसपणे कत्तलखाने सुरू आहे. शहर पोलिस त्यांच्या विरोधात थातुरमातुर कारवाई करत आहे. गोवंश हत्याबंदी कायदयातील तरतूदीतून पळवाट काढून कत्तल खाना चालक-मालकांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. (Latest Ahilyanagar News)
आत्तापर्यंत संगमनेर पोलिसांनी गोवंश हत्या आणि कत्तलखाने प्रकरणात एकाही कत्तलखाना चालक मालकावर एमपीडीएनुसार कारवाई केलेली नसताना देखील तशी कारवाई केली असल्याचे संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक व संगमनेर शहर पोलिस निरीक्षक यांनी गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना सांगत खोटी माहिती दिली.
यातून त्यांनी शासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी संबंधित पोलिस अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी. त्या माहितीची खातरजमा न करणारे अहिल्यानगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सक्त ताकीद देण्यात यावी, अशीही मागणी आमदार खताळ यांनी विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांकडे केली.
संगमनेर शहरातील महाविद्यालये, रुग्णालये व धार्मिकस्थळे, झोपडपट्टी परिसर इत्यादी ठिकाणी अवैध गुटखा, मादक पदार्थ, नशेची गोळी, सिगारेट तसेच अफू, गांजा जवळपासच्या पान टपरीवर खुलेआम विक्री केली जात आहे. मटका, ऑनलाईन जुगाराकडे बेरोजगार तरुणांच्या रांगा दिसून येत आहेत.
तसेच मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू निर्मिती, वाहतुक करून त्याची राजरोसपणे विक्री केली जात आहे. या माध्यमातून संगमनेरची तरुण पिढी नासवण्याचे काम होत आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. या सर्व प्रश्नांकडे आमदार खताळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधत या प्रकरणी दोषी असणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.