

पारनेर: मनसेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब माळी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
माळी व त्यांच्या प्रवेशावेळी शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांचे समर्थक असलेल्या बाळासाहेब माळी यांनी काही वर्षांपूर्वी मनसेमध्ये प्रवेश केला होता. (Latest Ahilyanagar News)
प्रवेशानंतर माळी यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. माळी यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या उमेदवारांनी विविध निवडणुकांमध्ये आपले नशीब अजमावले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मात्र, जामगाव ग्रामपंचायत निवडणुकीत माळी यांनी पत्नी पुष्पाताई माळी यांना बिनविरोध सरपंच करण्याची किमया करून दाखविली. त्यामुळे तालुक्यात मनसेच्या सरपंचाचे खाते उघडले गेले होते.
प्रवेशासंदर्भात माळी यांनी सांगितले की, मनसेमध्ये कार्यरत असताना आपण पक्षसंघटनेत वाढ केली. परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेची आवश्यकता असते. त्यामुळे पदाधिकार्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला असून, आगामी काळात गाव तिथे शिवसेनेच्या शाखा निर्माण करण्यात येणार असून, पक्षसंघटनेला बळकटी देण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
या वेळी तालुकाप्रमुख बाळासाहेब माळी, गजानन सोमवंशी, चंद्रकांत नांगरे, बबन गुंड, बाळासाहेब शिंदे, मनोज शिंदे, दिनकर सोबले, ज्ञानदेव घावटे, अविनाश औटी, सोपान चौधरी, राजेंद्र मेहेर, यश गुळवे, त्रिंबक पवार, दत्तात्रय धुरपते, अरुण धुरपते, विठ्ठल नांगरे, संपत रोहोकले, मारुती रोहोकले, अशोक शिंदे, गणेश माळी, अजय लोंढे, प्रशांत करंजुले, प्रमोद गिरी, अजय मेहेर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सक्षम उमेदवार देऊन निवडणुका लढविणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाट्याला ज्या जागा येतील त्या जागांवर सक्षम उमेदवार देऊन आम्ही लढणार आहोत. निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तयारीही सुरू केली असल्याचे माळी यांनी सांगितले.