Assault Case Pudhari
अहिल्यानगर

Sangamner School Assault Case: मुलास मारहाणीची चौकशी केल्याने पालकास मारहाण; संगमनेरमध्ये 9 जणांवर गुन्हा

शिक्षकांचा सहभाग असल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ, आंदोलनाची तयारी

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: मुलास मारहाण का केली, याची विचारणा केल्याचा राग आल्याने शिक्षक व इतरांनी पालकास मारहाण केल्याची घटना मंगळवारी संगमनेर खुर्द येथील एका विद्यालयात घडली. याप्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील खांडगाव परिसरातील वैदवाडी येथील सुरेश मारुती लोखंडे यांचा मुलगा मुकेश हा इयत्ता सहावीमध्ये संगमनेर खुर्द येथे एका विद्यालयात शिकण्यास आहे. दि. 26 जानेवारी रोजी मुकेश यास शाळेचे विलास दशरथ गुंजाळ यांनी तोंडात चापटीने मारहाण केली होती.

दरम्यान, आपल्या मुलास मारहाण का केली, याची विचारणा करण्यासाठी पालक सुरेश लोखंडे हे दि.27 रोजी शाळेत गेले. यावेळी गुंजाळ व लोखंडे यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर लोखंडे हे घरी गेले. हा वाद मिटवण्यासाठी पोलिस पाटील चंदर शिंदे यांनी मुलाच्या पालकाला शाळेत बोलावले. दुपारी साडेतीन वाजता ते आपला चुलतभाऊ अरुण मच्छिंद्र लोखंडे यांच्यासह शाळेत आले. यावेळी माफीनाट्य झाले.

मात्र, तु नाटक करतो, खोटे बोलतो, असे म्हणून विलास गुंजाळ व पप्पु पुंजा गुंजाळ यांनी लोखंडे याचा डोळ्यात मिरची पुड टाकुन डोळ्यांना दुखापत केली व खाली पाडून लाथाबुक्क्‌‍यांनी मारहाण केली. त्यांच्या सोबत असलेले राहुल दशरथ गुंजाळ, रवि दशरथ गुंजाळ, तुषार दगडु वर्पे, गणेश संभाजी गुंजाळ, ओमकार अशोक गुंजाळ, पवन एकनाथ वर्पे (सर्व राहणार खांडगाव) यांनी लाथाबुक्क्‌‍यांनी मारहाण केली. यावेळी चंदर शिंदे यांनाही दमदाटी करण्यात आली.

याबाबत सुरेश मारुती लोखंडे यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये शिक्षकांचा समावेश असल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या शाळेच्या विरोधात काही संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT