संगमनेर: नाशिकहून श्रीरामपूरच्या दिशेने चंदनाची लाकडे घेऊन जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारला पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले. कारच्या तपासणीत 5 लाख 70 हजार रुपयांच्या चंदनाच्या लाकडी, कार अशा मुद्देमालासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, गुरुवारी दि. 18 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणी परिसराच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून नाशिकहून चंदनाची लाकडे श्रीरामपूरकडे नेली जात असल्याची खात्रीशीर खबर मिळाली होती. या पथकाने संशयित वाहन पकडण्यासाठी तातडीने मोहिम राबवली. पोलिसांनी तळेगाव ते लोणी रोडवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम सेंटरसमोर सापळा लावला.
काही वेळातच संशयित कार येताना दिसली. पोलिसांनी तिला इशारा करून थांबवले. कारची झडती घेतली असता पोलिसांना त्यामध्ये 60 हजार रुपये किमतीची 30 किलो चंदनाची लाकडे, 5 लाख रुपयांची मारुती सुझुकी स्विफ्ट कार आणि 10 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 5 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात वन कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि त्यांच्या पथकातील राहुल द्वारके, भीमराज खर्से, राहुल डोके, प्रमोद जाधव, सतिश भवर, सुनील मालणकर आणि चालक महादेव भांड यांनी ही कारवाई केली आहे.
‘नाशिक ते श्रीरामपूर’ मोठे रॅकेट
या प्रकरणी पोलिसांनी हनुमंता भिमा मोरे (वय 45, रा. उंबरगांव, ता. श्रीरामपूर) याला अटक केली आहे. सखोल चौकशी केली असता, ही चंदनाची लाकडे त्याने उत्तम नारायण पवार (रा. सिन्नर, जि. नाशिक) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. सध्या मुख्य सूत्रधार उत्तम पवार हा फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.