संगमनेर: तालुक्यातील तिगाव येथील एका दगडाच्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा भावांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.22) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. महेश गोरक्षनाथ सानप (वय 18) आणि ओंकार गोरक्षनाथ सानप (वय 14), अशी मृत्यू झालेल्या दोघा भावांची नावे आहेत.
एकाच घरातील दोघा भावांचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. एका वर्षापुर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळेसानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण तिगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तिगाव परिसरातील एका मोठ्या दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी परिसरातील मुलांची नेहमी वर्दळ असते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास महेश आणि ओंकार हे दोघे भाऊ नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी या खाणीवर गेले होते. इतर मुलाप्रमाणे हे दोघे पाण्यात उणतले. मात्र, खाणीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडू लागले. त्यामुळे पाण्यात बुडत असताना एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच तिगावचे सरपंच ज्ञानेश्वर सानप यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही भावांना पाण्यातून बाहेर काढले. उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच दोघांना मृत घोषित केले. एकाच वेळी दोन तरुण मुलांचा मृत्यू झाल्याचे समजताच रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
याप्रकरणी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. पालकांनी आपल्या मुलांना अशा धोकादायक आणि खोल पाण्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
माजी मंत्री थोरातांकडून सांत्वन
घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज शनिवारी सकाळी तिगाव येथे जाऊन सानप कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर सानप, शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे, डॉ. संदीप गोर्डे, अनिल कांदळकर, वाल्मीक सानप, छबुराव सानप, नामदेव सानप, प्रभाकर कांदळकर, प्रकाश सानप, संजय सानप, योगेश सानप, विशाल सानप आदी उपस्थित होते. यावेळी थोरात यांनी आपले कार्यकर्ते व प्रशासनाला संबंधिताला तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर मुंबईहून परतल्यानंतर आज स्वतः तिगाव येथे जात कुटुंबियांचे सांत्वन केले. तिगावसह परीसरात विनापरवाना अनेक स्टोन क्रेशर सुरु आहे. यासाठी डोंगर फोडून खाणीतील दगडाचा वापर केला जातो. त्यामुळे खाणीत पाणी साचून दुर्घटना घडतात. महेश व ओंकार या दोघा भावाचाही अशाच खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने व पालकांनी उपाय योजना करणे गरजेचे आहे.
आ. खताळांकडून मदतीच्या सूचना
सदर घटनेची माहिती मिळताच आ. अमोल खताळ यांनी शनिवारी (दि.23) दुपारी तिगाव येथे जाऊन सानप कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. घटनेच्या अनुषंगाने आ. खताळ यांनी तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी चर्चा करून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून कुटुंबियांना मदत मिळवून द्यावी, अशी सूचना त्यांनी केली. दगड खाणी, बंधारे, तलाव, कालवे किंवा खोल पाण्याच्या ठिकाणी पाण्याची खोली, तळाचा अंदाज तसेच पाण्याच्या प्रवाहाची पुरेशी माहिती मुलांना नसते. त्यामुळे अशा ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत मुले पोहण्यासाठी अशा धोकादायक ठिकाणी जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुलांनी खोल पाण्याच्या ठिकाणी जाणे पूर्णपणे टाळावे. पालकांनीही पाल्यांवर लक्ष ठेवून त्यांना सुरक्षिततेबाबत सतत जागरूक करणे गरजेचे आहे.