दहशत निर्माण करण्याचा भाजपचा डाव: बाळासाहेब थोरात Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Politics| दहशत निर्माण करण्याचा भाजपचा डाव: बाळासाहेब थोरात

विधानसभेतील राड्याबाबत नागरिकांनी जाब विचारावा

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: महाराष्ट्रात गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून मुभा दिली जात असून राज्यात निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची घणाघाती टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

विधानसभेत गुरुवारी आमदार निवासातील हाणामारीची घटना व सध्याची राजकीय परिस्थितीवर थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या राज्यात जे घडत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. बीड मधील निरापराध सरपंचाला ज्या पद्धतीने मारले गेले. ते मानवतेला लाज वाटणारे आहे. एक आमदार पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहे. (Latest Ahilyanagar News)

एक आमदार कॅन्टीनमधील वेटरला मारहाण करत आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना गुंडांनी मारहाण केली ते गुंड भाजपचे पदाधिकारी आहेत. एखाद्या समाजाला विरोध करायचा, वडीलधार्‍यांना काहीही बोलायचे अशी भाजपने काही गुंड आणि वाचाळवीरांना मुभा दिलेली आहे. एक प्रकारे राज्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ही दहशत भाजप पुरस्कृत असून राष्ट्रीय पक्ष म्हणणार्‍या पक्षाला हे लाजिरवाणने आहे, असे थोरात म्हणाले.

मी चाळीस वर्षे विधानसभा सदस्य म्हणून काम केले. अशी संस्कृती कधीही नव्हती. वादविवाद असतात परंतु त्यानंतर चहापानासाठी एकत्र यायचे. परंतु सध्या गुंड विधानसभेत येत आहेत. मारहाण करतात. त्या गुंडांना संरक्षण दिले जाते आहे. मारहाण करणार्‍याला संरक्षण आणि मार खाणार्‍याला मात्र शिक्षा हा काय प्रकार आहे, हे जनतेने वेळीच ओळखले पाहिजे. याबाबत जागरूक होऊन सरकारला जाब विचारला पाहिजे, असे थोरात यांनी सांगितले.

महायुती सरकार अनेक खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आमिष दाखवले, मात्र पंधराशेही वेळेवर दिले जात नाहीत. अनेक लाडक्या बहिणींची नावे दररोज कमी केली जात आहेत. शेतकर्‍यांची कर्जमाफी नाही. शेतकरी अडचणीत आहेत. खरे तर शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे, असेही थोरात म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT