संगमनेर: संगमनेर नगरपालिकेत 3 स्वीकृत नगरसेवक पदाची अधिकृत घोषणा मंगळवारी (दि.13) रोजी पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात करण्यात आली. नाराजी नाट्यानंतर उपनगराध्यक्षपदी नूर मोहम्मद शेख यांची निवड जाहीर करून, त्यांचा सत्कारही उरकण्यात आला. या पार्श्वभूमीवर या पदासाठी इच्छुक असलेल्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दृश्य दिसले.
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीची एकहाती सत्ता आली. यामुळे स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्षपदावर नेमके कुणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले होते. स्वीकृत नगरसेवकपदी रचना मनीष मालपाणी, सोमेश्वर दिवटे व जावेद पठाण यांची सोमवारीच निवड करण्यात आली. याबाबत उत्कंठा संपल्यामुळे मंगळवारी केवळ तिघांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. उपनगराध्यक्षपद आपल्यालाचं मिळावे, यासाठी अनेक नगरसेवकांनी प्रयत्न केले, मात्र त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली नाही. या पदासाठी नाराजी नाट्य वाढल्यामुळे सोमवारी यावर एकमत होऊ शकले नाही. दरम्यान, मंगळवारी सेवा समिती नगरसेवकांच्या बैठकीत कुणाला संधी मिळते, अशी उत्सुकता ताणली असतानाच, शेख यांच्या नावाची घोषणा करून बैठक गुंडाळण्यात आली.
उपनगराध्यक्षपदाबाबत शहरात चर्चा झडली. चर्चेतून मार्ग काढला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. किमान बाजु मांडण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा अनेक नगरसेवकांना लागली होती, मात्र उपनगराध्यक्षपदी नूर मोहम्मद शेख यांच्या नावाची घोषणा करून, त्यांचा सत्कारही आमदार सत्यजित तांबे व नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे हस्ते करण्यात आला. यामुळे अनेक इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला. दुपारी 1230ः वाजता 3 स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा पालिका सभागृहात करण्यात आली. नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या अध्यक्षतेखाली रामकृष्ण सभागृहात झालेल्या सभेसाठी दयानंद गोरे, नगरसेवक योगेश जाजू , नितीन अभंग,दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, किशोर पवार, किशोर टोकसे, गणेश गुंजाळ, भारत बोराडे, शोभा पवार, वनिता गाडे, प्रियंका शहा, गजेंद्र अभंग, मालती डाके, शोभा पवार, अर्चना दिघे, डॉ. अनुराधा सातपुते, सौरभ कासार, सीमा खटाटे, दीपाली पंचारिया आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांची दाटली गर्दी
नवनिर्वाचित पदाधिकारी निवडीवेळी पालिकेच्या आवारात नागरिकांची मोठी गर्दी दाटली होती. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तर, मालपाणी उद्योग समूहाचे मनीष मालपाणी व गिरीश मालपाणी आवर्जून उपस्थित होते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
अनेकांनी पालिकेतून काढता पाय
उपनगराध्यक्षपदाची निवड अगोदरचं झाल्यामुळे केवळ औपचारिकताच पार पाडली. यावेळी सभागृहात उपस्थित नगरसेवकात फारसा उत्साह दिसला नाही. अनेक नगरसेवकांनी निवडीबद्दल प्रतिक्रिया देणे टाळले. निवडीनंतर अनेकांनी पालिकेतून काढता पाय घेतला.
‘एक हाती सत्ते’चा अर्थ समजला!
‘एक हाती सत्ता म्हणजे नेमकं काय?’ याचा अर्थ अनेकांना काल झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीवेळी खऱ्या अर्थाने समजला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सभागृहात सत्कार करण्यात आला.
नावाची अगोदरचं घोषणा
मंगळवार (दि.13) रोजी उपनगराध्यक्षपदी नुरमोहम्मद शेख, तर स्विकृत नगरसेवकपदी रचना मालपाणी, सोमेश्वर दिवटे व जावेद पठाण यांच्या निवडीची केवळ घोषणा सभागृहात करण्यात आली. उपनगराध्यक्षपदाबाबत नाराजी नाट्य टाळण्यासाठी अगोदरचं नावाची घोषणा करून, शेख यांचा सत्कारही करण्यात आला.