

नगर: अहिल्यानगर महापालिका निवडणूक प्रचारातील जाहीर सभांमधील आरोप-प्रत्यारोप, स्टार प्रचारकांच्या रॅली, मतदारांच्या घरादारांत उमेदवार आणि कार्यकर्त्यांची प्रचारासाठी उडालेली झुंबड आणि दिवसभर रिक्षांच्या माध्यमातून सुरू असलेला प्रचार आदींनी अहिल्यानगर शहर निवडणूकमय झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या जाहीर प्रचारांच्या तोफा मंगळवारी (दि.13) सायंकाळी थंडावल्या आहेत. मात्र, या प्रचाराच्या सांगता सभांना वा रॅलीत बाळासाहेब थोरात वगळता एकाही पक्षाचे स्टार प्रचारक फिरकले नाहीत. स्थानिक नेत्यांनीच आपापल्या स्तरावर जाहीर सभा, रॅली काढून प्रचाराची सांगता केली.
अहिल्यानगर महापालिकेच्या नगरसेवकपदांच्या 63 जागांसाठी 283 उमेदवार रिंगणात असून 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज माघारीची तारीख संपल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. गेल्या दहा दिवसांपासून प्रचाराचा धुरळा उडाला असून, स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा, रॅली आणि आरोप-प्रत्यारोपांनी शहरातील राजकीय वातावरण तापले होते.
भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जाहीर सभा आणि रॅली झाली. त्यानंतर तीन दिवसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेत प्रचारात रंगत आणली. भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रचारार्थ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी आणि सभा घेत वातावरण निर्मिती केली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची रॅली झाली. माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी ठिकठिकाणी बैठका सभा आणि रॅली काढत भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र इकडे फिरकलेच नाहीत. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी फक्त पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावली. महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार नीलेश लंके यांची एकमेव सभा झाली. काँग्रेस उमेदवारांसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुकुंदनगरात रॅली काढली. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांची मुकुंदनगरात जाहीर सभा झाली. आमदार हेमंत ओगले यांनी देखील कोठीत हजेरी लावली. एमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार असदुद्दिन ओवेसी यांची जाहीर सभा झाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेही स्टार प्रचारक अहिल्यानगरकडे फिरकले नाहीत. गेल्या दहा दिवसांपासून महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडाला. स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा, रॅली आणि आरोप -प्रत्यारोपांनी शहरातील राजकीय वातावरण तापले होते.
शेवटच्या दिवशी प्रचारात...
मंगळवारी (दि.13) सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार संपणार असल्याने या दिवशी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जागतिक कीर्तीचे कुस्तीपटू द ग्रेट खली यांची गणपती मंदिर ते दिल्ली गेट अशी रॅली काढण्यात आली. सायंकाळी पाच वाजता सर्जेपुरा येथे माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी जाहीर सभा घेतली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस व महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातून रॅली काढत मतदान करण्याचे आवाहन केले. इतर विविध पक्षांच्या सांगता सभांना स्टार व इतर नेते फिरकले नाहीत. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जात मतदारांना मतदानासाठी साकडे घातले आहे.