संगमनेरः संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. जाहीरनामे, आश्वासने बाहेर येऊ लागली आहेत.. मात्र, कुठल्याच राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केली जात नसल्याने अनेकांची गोची झाली आहे. युती आणि आघाडीसाठी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामुळे इच्छुकांनीही आता ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री यावर अंतिम निर्णय होणार आहे.(Latest Ahilyanagar News)
संगमनेर नगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून उमेदवारीची मागणी केली. मात्र महाविकास आघाडी व महायुतीतील पदाधिकारी यांच्याकडून जाहीरपणे कोणताही निर्णय होत नसल्याने इच्छुकांची गोची झाली आहे. पक्षाची उमेदवारी हवी असेल तर स्वबळावर लढावे, असाही काहींचा सूर आहे. तर युती, आघाडी झाली तर आपली उमेदवारी धोक्यात येणार असल्याचाही काहींना विश्वास आहे. त्यामुळे स्वबळाचा आग्रह आहे. तर काहींनी दुसऱ्या पक्षाकडूनही धागेदोरे लावण्याचे काम सुरू केल्याचे चित्र आहे. युती आणि आघाडीबाबत निर्णय झाल्यानंतर बंडखोरांना रान मोकळे होणार असल्याने, आपापल्या पक्षांच्या भूमिककडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 17 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. येत्या दोन-तीन दिवसांत अर्ज दाखल करण्यास वेग येणार आहे. यातच रविवारी सुट्टी असल्याने शनिवारी व सोमवारी असे दोनच दिवस हातात असणार आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींकडे नजरा असतील.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची बदली झाली. अकोल्याच्या मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्याकडे संगममनेरचा प्रभारी कार्यभार देण्यात आला होता. मात्र निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून दयानंद गोरे यांनी शुक्रवारी (दि.7) पदभार स्वीकारला आहे.
प्रांताधिकारी अरुण उंडे हे निवडणूक निर्णय अधिकारी असून तहसीलदार धीरज मांजरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करावयाचा असून त्याची प्रत प्रांत कार्यालयात जमा करावयची आहे. यासाठी प्रांत कार्यालयात उमेदवारांनासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट या सर्वच पक्षांचे पदाधिकारी संभ्रमात असून यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी पुढील धोका टाळण्यासाठी स्वतंत्र लढण्याच्या हालचाली सुरु केल्या आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे सध्या चाचपणी करत आहे. तर आमदार अमोल खताळ वरिष्ठांशी चर्चा करत असून लवकरात चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन संगममनेर शहराच्या विकासाबाबत मतदारांकडून सूचना मागवल्या आहेत. संगमनेर 2.0 नावाने पुढील 50 वर्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.