संगमनेर: कौठेमलकापूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित जागेवर सुरू असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामाला परिसरातील नागरिकांनी विरोध केला. भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. १९) आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी दहा ते बारा आंदोलकांना अटक करून नंतर सोडून दिले.
साकूरसह पठार भागात युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने कौठेमलकापूर येथे शेकडो हेक्टर जागेवर औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून हा प्रकल्प मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित जागेवरच सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम बुधवारी सुरू झाल्याने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे, सरपंच रवींद्र दातीर, रणजित ढेरंगे, सोमनाथ बारवे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि असंख्य ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा देत सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध केला. येथून जागेवरून सौर प्रकल्पाचे सर्व साहित्य तातडीने हटवावे आणि काम पूर्णपणे बंद करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
औद्योगिक वसाहत होऊ नये म्हणूनच या ठिकाणी सौर प्रकल्प आणला आहे का, असा सवाल वक्त्यांनी उपस्थित केला. या प्रकल्पामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोपही करण्यात आला. केवळ काम स्थगित करून चालणार नाही, तर सौर प्रकल्पाचे साहित्यही प्रस्तावित जागेतून तातडीने हटवावे, या मागणीवर आंदोलक ठाम राहिले. दोन दिवसांच्या आत प्रकल्पाचे साहित्य हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गुलाबराजे भोसले यांनी दिला.
आंदोलकांनी नायब तहसीलदार गणेश आढारी यांना निवेदन दिले. पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि उपनिरीक्षक प्रवीण महाले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांच्यासह रणजित ढेरंगे, सरपंच रविंद्र दातीर, सोमनाथ बारवे यांच्यासह सुमारे १० ते १२ आंदोलकांना ताब्यात घेतले. घारगाव पोलिस ठाण्यात नेऊन नोटीस देऊन त्यांना सोडून दिले.