Sangamner Bus Stand Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Bus Stand Problem: संगमनेर हायटेक बसस्थानक गुन्हेगारांचे अड्डे बनले

तळीराम, भुरटे चोर, टारगटांचा त्रास; प्रवासी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: संगमनेर शहरातील हायटेक बसस्थानक परिसर हा तळीरामांचा अड्डा बनला आहे. प्रवाशांना बसस्थानकावर अवैध खाजगी प्रवासी वाहनांसोबतच चोरटे, तळीराम आणि टारगटांचाही त्रास सहन करावा लागत आहे. आगार व्यवस्थापक व पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने हायटेक बसस्थानक गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर बसस्थानकावर भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने, रोख रक्कम लांबविल्याच्या अनेक घटना घडल्या असून पोलिस दप्तरी तशी नोंद करण्यात आली आहे. मात्र तरीही चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नसल्याने याचा गैरफायदा भुरटे चोर घेत आहेत. यातच आता खाजगी दुचाकी, चारचाकी वाहने थेट बसस्थानकाच्या फलटासमोरच लावून नागरीक वाहतुकीला अडथळा आणत आहे.

बसस्थानकाच्या मुख्य आवारातच अनेक खाजगी वाहने लावली जातात. भुरटे चोर, टारगट तरुण, तळीराम, अवैध फेरीवाले, भिकारी, दादागिरी करणारे, विनाकारण बसस्थानकावर फेऱ्या मारणारे अशा सर्वांचाच त्रास प्रवाशांना होत असून विशेषतः मुली व महिला प्रवाशांची यामुळे मोठी कुचंबना होते. बसची वाट पाहत उभे असलेल्या प्रवाशांसमोरच बसस्थानकावर अनेक टारगट तरुण भरधाव वाहन चालवतात. याचा त्रास बसचालकांनाही होतो. अपघात होण्याची भिती असल्याने पायी चालताना प्रवाशांना जीव मुठीत धरून चालावे लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी तर बसस्थानकात महिलांना उभे राहणे अवघड झाले आहे.

बसस्थानकावर पोलिस चौकी असली तरी येथे पोलिसांची नेमणूक करण्यात आली नाही. व्यापारी संकुलातही खाजगी पार्किंग केली जात असून याचा त्रास व्यावसायिकांना होतो. बेशिस्तपणा वाढल्याने डोकेदुखी वाढली आहे. संगमनेरचे हायटेक बसस्थानकाला समस्यांनी विळखा घातला आहे.

खाजगी वाहनांना अनेकदा दंड केला आहे. आम्ही प्रवाशांना न्यायला आलो आहे, असे सांगुन अनेक प्रवासी वादही घालतात. तरुण दादागिरी करतात, यांना आवर घालण्याचे काम पोलिसांचे आहे. आम्ही प्रवाशांना सेवा देत असतो, त्यामुळे वाद टाळतो. पोलिसांनी यावर कारवाई केली पाहिजे.
प्रशांत गुंड, आगार व्यवस्थापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT