संगमनेर: गोवा बनावटीच्या व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारूची तस्करी, विक्री व बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. यात गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स, नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे असा तब्बल ५ लाख ३८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानाजवळील शिवाजीनगर परिसरातील एका घरात गोवा राज्यातील प्रतिबंधित मद्याचा मोठा साठा असल्याची खात्रीशीर बातमी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. या आधारे पथकाने तातडीने सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईत शिवकुमार मनोजकुमार कालडा आणि सौरभ अरविंद पापडेजा (दोघे रा. संगमनेर) या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून 'रॉयल इम्पॅक्ट' व्हिस्कीचे ३४ बॉक्स, विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे आणि वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, ही तयार केलेली बनावट दारू नेहरू चौकातील 'हॉटेल सुरभी एफ.एल.-३' (परवाना क्र. १९३) येथे विक्रीसाठी पाठवण्यात येत असल्याची आरोपींनी कबुली दिल्याची माहिती पथकाकडून समजली.
दरम्यान, या माहितीनंतर पथकाने लागलीच हॉटेल सुरभीवर छापा मारून ६१ हजार ३१० रुपये किमतीच्या बनावट दारूच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
शहरासह तालुकाभरात परराज्यातून बनावट दारूची तस्करी होत असल्याचे समोर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी व पैशांच्या हावेपोटी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संगमनेरकरांमधून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्राची देखणे करीत आहेत.