नगर: समृध्दी महामार्गावर गडचिरोलीच्या खाणीमध्ये विक्री करण्यासाठी जाणारा 34 हजार लिटर अवैध डिझेलचा टँकर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. ताब्यातील आरोपींकडून 55 लाख 87 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
महादेव वचिष्ट डांगे (रा. शिवाजीनगर,नेरुळ नवी मुंबई, मुळ रा. पिंपळवाडी, सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलिस अंमलदार विजय पवार, राहुल द्वारके, प्रकाश मांडगे, सुनील मालणकर, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अवैध डिझेल टँकर (एमएच 43 बीपी 5085) सुरजगड (जि. गडचिरोली) येथील खाणीमध्ये विक्री करण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने समृध्दी महामार्ग सापळा लावला. संशयित टँकर येताना दिसून आल्याने पथकाने टँकर ताब्यात घेतला.
8208703007 मोबाईलवरून डिझेल भरण्याचे लोकेशन प्रतीक सानप (फरार) यास आले. त्यानंतर प्रतीक सानपने ते लोकेशन चालक कापसेला पाठविले. प्रमोद हरणे (फरार) यांच्या सांगण्यावरून साई प्रसाद पेट्रोल पंप, स्टेट हायवे 44 वरील हिंदुस्थान पेट्रोल पंप व शहापूर खर्डी रोडवरील हिदुस्थान पेट्रोल पंपावरू डिझेल भरून ते सुरजागड (गडचिरोली) येथे घेऊन जात असल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले.
डिझेल व टँकरबाबत कोणताही परवाना चालकाकडे आढळून आला नाही. पोलिसांनी 25 लाखांचा टँकर व 30 लाख 87 हजार 840 रुपयांचे 34 हजार लिटर डिझेल असा 55 लाख 87 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.