नगर तालुका: महाराष्ट्रात काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भाग, शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतजमिनी खरडून गेल्या, गावोगावे पाण्याखाली गेले, जनावरे व गुरेढोरे मृत्युमुखी पडले, घरदार,संसारोपयोगी साहित्य तसेच मुलांचे शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
हाताशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची जगण्याची उमेद संपुष्टात आली आहे. येणाऱ्या काळात आत्महत्यांचा धोका निर्माण झाला आहे. या भीषण परिस्थितीत सरकारने कोणतेही निकष न लावता तिजोरी खुली करून पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी, हेक्टरी किमान 1 लाख रुपयांची मदत, गुराढोरांना बाजारभावानुसार नुकसानभरपाई, तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. (Latest Ahilyanagar News)
सोमवारी राज्यभर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नावर जागरण गोंधळ आंदोलन केले. सरकारने पुढील दोन दिवसांत योग्य ती उपाययोजना केली नाही, तर मुख्यमंत्र्यांंच्या वर्षा बंगल्यावर गोंधळ घालण्याचा इशारा या आंदोलनादरम्यान देण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष शाम जरे, पारनेर तालुकाध्यक्ष सचिन काकडे, नगर तालुकाध्यक्ष महेश दानवे, तसेच सुयोग धस, दिलीप वाळुंज, बापू जगताप, अच्युत गाडे, तरटे तात्या, विकास उदगीरे, अंबादास जाधव, संदीप मांडरे, सागर भोस, शंतनू जाधव, अमोल आगलावे, देवीदास गवळी, विकास पवार, दिलीप आगलावे, संतोष कोकाटे, सुभाष आगलावे, बालू बोरुडे, धोंडीराम आगलावे आदी उपस्थित होते.