

कर्जत: शहरातील माय मोहर्ताब देवीला तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेसोबतच्या सीमोल्लंघन सोहळ्यात अग्रस्थानी मान प्राप्त आहे. यासाठी यंदाही पाचव्या माळेस कर्जतच्या वेशीतील मंदिरातून देवीचे प्रस्थान झाले.
माय मोहर्ताब देवी हे एक जागृत देवस्थान आहे. या देवीला दसऱ्याच्या दिवशी तुळजापूरमध्ये सीमोल्घनमध्ये अग्रस्थान आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी या देवीचे कर्जतमधून वाजत-गाजत मोठ्या उत्साहात आराध्यांच्या मेळ्यामध्ये आई राजा उदो उदो चा गजर करीत प्रस्थान झाले. देवीचे गाणे म्हणत. पोत खेळत हा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ही शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे. (Latest Ahilyanagar News)
यावेळी मंदिराचे पुजारी अंबादास क्षीरसागर यांनी सांगितले की, लहानपणी तुळजाभवानी माता कर्जत येथे क्षीरसागर घराण्याच्या घरी आंबिका नावाने वास करून होती. तिचा सांभाळ आमच्या पूर्वजांनी केला. नंतर खऱ्या रूपाचे दर्शन देऊन ती अंतर्धान पावली.
यावेळी देवीने आमच्या पूर्वजांना तुळजापुरला दरवर्षी दसऱ्याला येण्याचं निमंत्रण दिले. आणि तेव्हापासून माय मोहर्ताब या नावाने पूजली जाऊ लागली. तेव्हापासून दरवर्षी दसऱ्याच्या सीमोल्लंघनासाठी तुळजापूरला माय मोहर्ताब देवीला निमंत्रण देण्याची परंपरा आहे.
दशऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन सोहळ्यात कर्जतची माय मोहर्ताब देवी सर्वप्रथम अग्रभागी असते. देवीची मूर्ती अंबादास क्षीरसागर यांच्या हस्ते वाहिली जाते, तर दिवटीचा मान राम सुतार यांना आहे. सीमोल्लंघनानंतर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देवीचा मान सत्काराने गौरविला जातो.
देवीच्या महाआरतीचा मान महामुनी घराण्याकडे असून, न्यायालयाजवळील अक्काबाई मंदिर, झारेकरी गल्लीतील कालिका माता मंदिर आदी ठिकाणीही नियमित आरत्या व भक्तिगीते सुरू असतात.