नगर: भोंदू अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या समता पतसंस्थेतील बनावट खात्यांद्वारे झालेल्या व्यवहारांचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तपासादरम्यान नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत असून, खरातच्या दोन मुलीही ‘समता’ पतसंस्थेच्या खातेदार असल्याचे उघड झाले आहे. दोन मुलींच्या चार खात्यांवरून दोन कोटीपेक्षा अधिकचे व्यवहार झाले असून पोलिस त्याची खातरजमा करणार आहेत.
दरम्यान, समता पतसंस्थेतील 57 जणांच्या 100 खात्यांना खरात स्वत: नॉमिनी असून त्याचेच मोबाईल नंबर लिंक आहेत. त्याची तपासणी सुरू असून आतापर्यंत 45 खातेदारांनी ‘समता’मधील खाते आणि व्यवहाराशी संबंध नसल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. या 45 खात्यातून सुमारे 50 कोटी रुपयांची आर्थिक व्यवहार झाले आहेत.
हे सगळेच व्यवहार संशयास्पद असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ‘समता’त खाते असणाऱ्या दोन मुलींचे जबाब शिर्डी पोलिसांकडून नोंदविले जाणार आहेत. त्याच्या सहीची पडताळणी केली जाणार असल्याचे समजते. राजकीय नेत्यांच्या संपर्कातील दीपक लोंढेच्या चौकशीनंतर त्याच्या पत्नीचाही पोलिसांनी जबाब नोंदविला. तिच्या नावे असलेल्या समतामधील खात्याशी संबंधाचा तिनेही इन्कार केला आहे. लोंढेच्या समतामधील दोन खात्यांमधून सुमारे एक कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समजते.
आता खरातची प्रतीक्षा
शिर्डीतील दोन गुन्ह्यांमध्ये पोलिसांना अशोक खरात हवा आहे. तसेच नाशिकमधील दोन महिलांशी संबंधित गुन्हे प्रलंबित असून, त्या प्रकरणांतही त्याला ताब्यात घेतले जाऊ शकते. पुढील 10 ते 12 दिवसांत खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. खरातच्या चौकशीतून समता पतसंस्थेतील खाती कोणी उघडली, खाते उघडताना तसेच डिपॉझिट व विड्रॉल पावत्यांवरील बनावट स्वाक्षऱ्या कोणी केल्या, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच समता पतसंस्था आणि खरात यांच्यातील संबंध काय आहेत, या सर्व बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
‘समता’च्या व्यवस्थापकाचे काय?
मुंबईतील दिनेश परब यांच्या फिर्यादीवरून भोंदू खरातसह समता पतसंस्थेच्या राहाता शाखेच्या मॅनेजर विरोधात शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल आहे. बनावट खाती नेमकी कोणी उघडली, त्या खात्यांवरील स्वाक्षऱ्या कोणाच्या, तसेच व्यवहार कोण करत होते, याबाबत संबंधित व्यवस्थापकाकडूनही पोलिसांना मिळू शकते. पण पोलिस त्यांच्याकडे चौकशीची टाळाटाळ करत आहेत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. खरातच्या ताब्यानंतर शिर्डी पोलिसांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच पण त्याअगोदर समताच्या राहाता शाखेच्या मॅनेजरला ताब्यात घेतले तरी पोलिसांना बनावटगिरी उघड करता येणे शक्य आहे. मात्र त्यासंदर्भातील पोलिसांची संदिग्ध भूमिका आता चर्चेचा विषय ठरू पाहत आहे.