Ashok Kharat case  Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat Case: ‘समता‌’मधील खरातच्या व्यवहारातही ईडीची एन्ट्री?

नॉमिनी असलेल्या खात्यांतील पावत्यांची होणार पडताळणी

पुढारी वृत्तसेवा

नगर: समता पतसंस्थेतील भोंदू खरातच्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीत आता ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान शिर्डीतील फसवणूक व सावकारकीच्या गुन्ह्यात कल्पना अशोक खरात हिने राहाता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून 10 तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे. याच गुन्ह्यात अटकेतील बावके व सोनवणे यांना पोलिस कोठडीचा हक्क राखीव ठेवत न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे.

भोंदू अशोक खरात याच्या ‌‘समता‌’ पतसंस्थेतील बेनामी व्यवहारांंचा लेखाजोखा नगर पोलिसांकडून ईडीसमोर मांडला जाणार आहे. भोंदू खरातने समतामधील ज्या खात्यातून आर्थिक उलढाल केली, ते खाते आपले नसल्याचा दावा खातेदारांनी केला आहे.

त्यामुळे पोलिसांनी समताकडून खरात नॉमिनी असलेल्या खात्यांत पैसे भरणे व काढणे प्रक्रियेच्या पावत्या मागविल्या आहेत. त्यातून खरातच्या उलाढालीत आणखी स्थानिक कोणाचा सहभाग आहे का? हे समोर येणार आहे.

रावसाहेब गोंदकर जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणात आरोपी किरण सोनवणे आणि अरविंद बावके यांना पोलिस कोठडीचा हक्क राखीव ठेवत न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

शिर्डीतील सावकारी व फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी कल्पना खरात ही पसार आहे. मात्र तिने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

‌‘त्या‌’ पतसंस्थांच्या अहवालाकडे नजरा

नागेबाबा, राहाता पिपल्स, बुलढाणा अर्बन आणि राहात्याची स्वामी विवेकानंद पतसंस्थांमध्येही खरातने आर्थिक उलाढाल केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी या चारही संस्थांना पत्र पाठवत खरात संबंधी व्यवहार कळविण्याचे पत्रात म्हटले आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत यासंबंधीची माहिती संकलीत करण्याची प्रक्रिया सुरू होती. मंगळवारी ती पोलिसांना मिळेल, त्यानंतरच खरातचे आणखी व्यवहार आहे की कसे? हे समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT