संगमनेर: टाळ-मृदंगाच्या तालावर ‘ग्यानबा तुकाराम’ असा गजर करत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या शेकडो वारकर्यांसह संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यात पारेगाव बुद्रुक (ता. संगमनेर) येथे सोमवारी (दि. 16) आगमन झाले. या दिंडीचे जिल्ह्यातर्फे पारंपरिक पद्धतीने पूजन करून स्वागत करण्यात आले.
हातात टाळ मृदुंग, विठ्ठलनामाचा गजर करत रिमझिम पावसात निसर्गरम्य वातावरणात ही दिंडी सुमारे वीस हजार वारकर्यांसह मजल दरमजल करत सोमवारी पारेगाव बुद्रुक येथे दाखल झाली. संगमनेर तालुक्यात या दिंडीचे आगमन होताच स्वागत करण्यासाठी वारकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय नेते, ग्रामस्थ, शासकीय पदाधिकारी उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात आदींसह मान्यवरांनी दिंडीचे स्वागत केले.
यावेळी निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ घोटेकर, अॅड. त्र्यंबकराव गडाख, साहेबराव गडाख, दौलत गडाख, सोमनाथ गडाख, सचिन गडाख, बी. आर. चकोर, नवनाथ आरगडे, विजय रहाणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहातर्फे वारकर्यांना विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
संत निवृत्तीनाथांच्या पालखीसह ही दिंडी पारेगाव बुद्रुक येथे मुक्कामाला येते. मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या वारकर्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात जिल्ह्यात प्रवेश केला.
अश्विनाथ विद्यालयाचे लेझीम पथक, पारंपरिक वाद्य व वेशभूषा करून गावकर्यांनी व विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले. दिंडीत सहभागी झालेल्या वारकर्यांनी फुगडी खेळत, डोक्यावर तुळशी वृंदावन घेत, अभंग गायले. हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीतून दूरध्वनीद्वारे वारकर्यांशी संवाद साधला. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून अॅम्बुलन्स, अमृत उद्योग समूहातील संस्थांच्या माध्यमातून वारकर्यांसाठी राहण्याची सुविधा, पिण्यासाठी पाण्याचे टँकर, वैद्यकीय सुविधा, लाईट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातून दिंडी मार्गस्थ होईपर्यंत सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचना थोरात यांनी यशोधन व अमृत उद्योग समूहाला दिल्या आहेत.