शिर्डी: गुरूपौर्णिमेच्या तीन दिवसीय उत्सव काळात साईबाबा संस्थानला विविध स्वरूपात 6 कोटी 31 लाख रुपयांची देणगी मिळाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
9 ते 11 जुलै काळात शिर्डी येथे गुरूपौर्णिमा उत्सव सोहळा झाला. दक्षिणापेटी, देणगी काऊंटर, ऑनलाईन, चेक डीडी, मनिऑर्डर, डेबीट-क्रेडीट कार्ड, युपीआय, सोने, चांदी व दर्शन/आरतीपास शुल्क माध्यमातून 6 कोटी 31 लाख 31 हजार 362 रुपये देणगी प्राप्त झाली. (Latest Ahilyanagar News)
श्री गुरूपौर्णिमा उत्सव कालावधीत सुमारे 3 लाखाहून अधिक साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्सव कालावधी मध्ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे 1 लाख 83 हजार 532 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर दर्शन रांगेत 1 लाख 77 हजार 800 साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले.
सशुल्क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्या विक्रीतून 64 लाख 5 हजार 460 रूपये प्राप्त झाले. उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवासस्थान, व्दारावती निवासस्थान, साईआश्रम निवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरीता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला.
भाविकांनी दिलेल्या देणगीचा वापर श्री साईबाबा संस्थानचे प्रसादालय, रुग्णालये, शैक्षणिक संकुल या सेवाकार्या बरोबरच साईभक्तांच्या विविध सेवा सुविधांसाठी होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.
रोख: 18808194 दक्षिणा पेटीत
देणगी काऊंटर 11784538
सशुल्क पास 5588200
डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर : 20576626
सोने 668.400 ग्रॅम (57 लाख 87 हजार)
चांदी 6798.680 ग्रॅम (5 लाख, 85 हजार)