नगर तालुका : खोसपुरी येथील जय भवानी सांस्कृतिक कला केंद्रात रविवारी(दि. 4) रात्री काही मद्यपी तरुणांनी महिलांना मारहाण करीत शिवीगाळ केली. याप्रकरणी कला केंद्रातील महिलांनी पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत निवेदन दिले. दरम्यान, सोमवारी (दि.5) याच कारणावरून वंजारवाडी येथे तरुणावर तलवारीने हल्ला झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत
निवेदनात म्हटले आहे की, कला केंद्रावर रविवारी (दि. 4) रात्री 12 ते 1च्या सुमारास काही युवक मद्यधुंद अवस्थेत आले होते. महिलांनी, कला केंद्र बंद झाले आहे, असे सांगितले असता त्या युवकांनी महिलांना अपशब्द वापरत शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर 4 ते 5 मोटरसायकलवरून 8 ते 10 युवक हातात तलवार, काठ्या, गज घेऊन आले. त्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेऊन गेले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अक्षय रामदास चेमटे (रा. घोडेगाव), सचिन महादेव दराडे, आकाश मच्छिंद्र दराडे (दोघे रा. वंजारवाडी, ता. नेवासा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कला केंद्रात पैसे लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून तरुणावर दोघांनी तलवारीने डोक्यात व पोटात वार करून खुनाचा प्रयत्न केला. ही घटना सोनई ते राहुरी रस्त्यावरील वंजारवाडी बसस्थानकाजवळ सोमवारी (दि. 5) रात्री घडली.
जखमी अक्षय रामदास चेमटे (वय 25, रा. घोडेगाव ता. नेवासा) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. 7) रात्री उशिरा फिर्याद दिली. खोसपुरी येथील जयभवानी कला केंद्र येथे रविवारी (दि. 4) रात्री फिर्यादी व भरत पालवे, विशाल भरत पालवे (दोघे रा. पांढरीपूल, वांजोळी ता. नेवासा), सचिन साहेबराव डोळे (रा. डोळे वस्ती, वंजारवाडी ता. नेवासा) आणि कला केंद्रावरील चार महिला यांच्यात वाद झाले होते. या वादाचा मनात राग धरून सोमवारी (दि. 5) रात्री अक्षय चेमटे व त्याच्या मित्राला वंजारवाडी बसस्टँडजवळ भरत पालवे व इतरांनी अडवले. त्यावेळी अक्षय चेमटे त्यांना समजावून सांगत असताना भरत पालवे याने अचानक तलवारीने अक्षयच्या डोक्यात वार केला. सचिन डोळे याने तलवार अक्षयच्या पोटात खुपसली. या वेळी महिलांनी दराडे यास मारहाण केली. दवाखान्यात उपचार घेत असताना त्याने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी 4 महिलांसह 7 जणांवर गुन्हा दाखल केला.