वांबोरी: राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील सुभाष नगर परिसरात राहणार्या निवृत्त शिक्षक शंकरराव शेवाळे व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासकीय स्वीय सहाय्यक समर्थ शेवाळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे वांबोरीकरांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
शंकर शेवाळे व सुमन शेवाळे हे निवृत्त शिक्षक दाम्पत्य कार्यक्रमानिमित्त परगावी गेलेले असताना सोमवारी (दि. 19) मध्यरात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास वांबोरी डेअरी रोडवरील सुभाषनगर येथे सहा चोरट्यांनी गावठी कट्टा व तलवारी घेऊन येत शेवाळे यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातून सुमारे आठ तोळे सोन्याचे दागिने व एक लाख दहा हजार रुपये रोख लांबवली. (Ahilyanagar News update)
दरम्यान, वांबोरीतील नागरिक अनिल कुसमुडे व प्रमोद नवले तेथून जात असताना शेवाळे यांच्या घरासमोर मोटरसायकलवर एक तरुण संशयास्पदरीत्या उभा दिसला. त्याला कुसमुडे यांनी ‘कोण आहे रे तू, एवढ्या रात्री इथे काय करतो,’ अशी विचारणा केली असता, त्या तरुणाने अन्य साथीदारांना सांकेतिक भाषेत आवाज देऊन बाहेर बोलावले.
त्यातील एकाने कुसमुडे व नवले यांच्यावर गावठी पिस्तूल रोखले व जाण्यास सांगितले. परंतु कुसमुडे व नवले यांनी प्रतिकार करत थांबून राहिल्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. वांबोरीकडून नगरच्या दिशेने मोटरसायकल घेऊन हे चोरटे सुसाट वेगाने निघून गेले.
कुसमुडे यांनी तत्काळ वांबोरी पोलिस दूरक्षेत्रातील पोलिस हेडकॉन्स्टेबल आजिनाथ पालवे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. पालवे तत्काळ घटनास्थळी आले. पोलिस उपनिरीक्षक समाधान पडोळ हेही दाखल झाले.
नंतर अहिल्यानगर येथून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना बोलावण्यात आलेे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती सुभाष पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलिस फौजफाटा वांबोरीत दाखल झाला होता. चोरटे पसार झालेल्या मार्गातील सीसीटीव्ही फुटेज पोलिस शोधत आहेत.
जागरण गोंधळ आणि मंत्र्यांच्या सहायकाचे घर
अतिशय रहदारी व गावाच्या मध्यवस्तीत असलेल्या शेवाळे यांच्या घरी चोरट्यांनी डाव साधत लाखोंचा ऐवज लंपास केला. मात्र चोरीच्या ठिकाणापासून 100 मीटरवर रात्री जागरण गोंधळ सुरू असल्यामुळे या आवाजाचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरी केल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या घरीच चोरट्यांनी हात साफ केल्यामुळे, आता व्हीआयपींचे घर शाबूत नाही, तिथे सामान्यांची काय अवस्था असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
गस्त झाली सुस्त
वांबोरी गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली पोलिस व समाज कार्यकर्ते तसेच पोलिस मित्र यांच्या एकत्रित सहकार्याने वांबोरीमध्ये गस्त मोहीम राबवली जात होती. परंतु अलीकडील काळात रात्रीची गस्त ही जणू सुस्त झाल्यामुळे गावची सुरक्षा रामभरोसे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहेत.