Ashok Cooperative Bank Pudhari
अहिल्यानगर

Ashok Cooperative Bank RBI Restrictions: अशोक सहकारी बँकेवर आरबीआयचे सहा महिन्यांचे निर्बंध; ठेवीदारांमध्ये खळबळ

384 कोटींच्या ठेवी, 423 कोटींचे कर्जवाटप; ‘सीए असलो तरी बँकेच्या कारभारात नापास झालो,’ भानुदास मुरकुटेंची भावनिक कबुली

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: भारतीय रिझर्व्ह बँकेने अशोक बँकेच्या संचालक मंडळाशी व वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून बँकेच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ठोस उपाययोजना बँकेकडून करण्यात न आल्याने रिझर्व्ह बँकेने बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 मधील कलम 35A सह कलम 56 अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेने अशोक सहकारी बँक लि., अहमदनगर यांना दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी अशोक बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध जारी केले आहे.

या निर्देशांनुसार, रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय बँक कोणतेही कर्ज किंवा आगाऊ रक्कम मंजूर किंवा नूतनीकरण करू शकणार नाही, कोणतीही नवीन गुंतवणूक करू शकणार नाही, कोणतीही नवीन देयता स्वीकारू शकणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारे निधी उधार घेणे किंवा नवीन ठेवी स्वीकारणे यासारखी कामे करू शकणार नाही. तसेच, बँक आपल्या कोणत्याही मालमत्ता किंवा साधनांची विक्री/हस्तांतरण करू शकणार नाही, मात्र रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांमध्ये परवानगी दिलेल्या बाबी याला अपवाद राहणार आहेत. बँकेच्या सध्याच्या तरलता स्थितीचा विचार करून बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्यास परवानगी देऊ नये, असे बँकेला निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या ठेवींमधून बँकेची काही आवश्यक देणी/खर्च, जसे की कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे, वीज बिल इत्यादी, ठरविलेल्या अटींनुसार भागविता येतील.

ठेवींवर पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण

पात्र ठेवीदारांना ठेवींच्या रकमेपैकी जास्तीत जास्त पाच लाख रुपयेपर्यंतची रक्कम डीआयसीजीसीकडून ठेवी विमा दाव्याच्या स्वरूपात मिळू शकते. यासाठी संबंधित ठेवीदारांनी आवश्यक विहित कागदपत्रे/संमतीपत्र सादर करणे आणि पडताळणी पूर्ण होणे आवश्यक आहे.

बँकेचा परवाना रद्द झालेला नाही

रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, हे निर्देश जारी करणे म्हणजे बँकेचा बँकिंग परवाना रद्द करणे नव्हे. बँक या निर्देशांमध्ये नमूद केलेल्या निर्बंधांच्या अधीन राहून आपला बँकिंग व्यवसाय सुरू ठेवू शकते. रिझर्व्ह बँकेच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवणार असून, परिस्थितीनुसार आणि ठेवीदारांच्या हितासाठी आवश्यक त्या सुधारणा/पुढील कारवाई करू शकते.

सीए असलो तरी बँकेत नापास: भानुदास मुरकुटे

अशोक बॅंकेबाबत काही ठेवीदारांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) तक्रारी केल्या. काहींनी जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या. त्यामुळे 28 तारखेच्या सायंकाळपासून आरबीआयने बँकेवर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे बँकेचे व्यवहार सध्या बंद राहणार असले, तरी पाच लाख रुपये ठेवी असणाऱ्यांना तीन महिन्यांत व त्यापुढच्या रकमा असणाऱ्यांना सहा महिन्यांत सर्व पैसे परत मिळतील. वसुलीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही बँकेचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ‘मी सीए असलो तरी अशोक बँकेच्या कारभारात मात्र नापास झालो,’ अशी भावनिक कबुलीही देत, ‘या परिस्थितीला व्यक्तिशः मी स्वतः आणि बँकेचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहोत,’ असेही मुरकुटे म्हणाले.

आर्थिक अनियमितता असल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने अशोक बँकेवर विविध निर्बंध घातल्याचे पत्र शुक्रवारी प्राप्त झाले. ही बातमी सर्वत्र पसरल्यानंतर शनिवारी बँकेमध्ये ठेवीदारांची मोठी गर्दी उसळली. या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.

अफवांमुळे करंट, सेव्हिंग आणि पिग्मी अकाउंटचे पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये गर्दी उसळल्यामुळे बँकेची तरलता डिस्टर्ब झाली. त्याचच काहींनी ‘आरबीआय’कडे तक्रारी केल्या. त्यामुळे बँकेवर निर्बंध लावण्यात आले. मुदत ठेवीच्या पावत्या मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र प्रीमॅच्युअर ठेवी देता येत नाहीत, असेही ते म्हणाले.

सीडी रेशोमध्ये तफावत

बँकेमध्ये 384 कोटी रुपयांच्या ठेवी असून कर्जवितरण मात्र 423 कोटींचे झाले आहे. त्यामुळे सीडी रेशोमध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. कर्जदारांनी वेळेवर पैसे न भरल्याने थकबाकी वाढली. त्याचा परिणाम दैनंदिन व्यवहारावर झाला आहे. अफवा पसरल्याने गर्दी झाली आहे. लोक एकदम पैसे घ्यायला आले. त्याचाही परिणाम झाल्याचे सांगून मुरकुटे म्हणाले, की जिल्ह्यातील इतर बँकांवरही यापूर्वी अशी बंधने लावण्यात आली होती, मात्र ती सुरळीत झाली. अशोक बँक सुद्धा सहा महिन्यांत पूर्वपदावर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमासंरक्षण असल्याने नव्वद दिवसांच्या आत व्याजासकट ते पैसे परत दिले जाणार आहेत, अशी ग्वाही देत पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी सहा महिन्यांत परत देणार आहोत. वसुली नियमित चालू राहणार असून वसूल झालेली रक्कम बँकेत जमा होणार आहे. ती ठेवीदारांना देण्यात येणार आहेस अले सांगून ‘बँकेवर निर्बंध लागले असले तरी बँकेचा परवाना रद्द झालेला नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

ठेवीदार, सभासदांना सहकार्याचे आवाहन

बँकेतर्फे नगरमध्ये दीडशे कोटीचे तर पुण्यामध्ये तीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. वसुलीसाठी बँकेने कर्जदारांना जप्तीच्या नोटिशी दिल्याने ते नाराज झाले. काहींनी नकारात्मक चर्चा केली. कर्जवाटप ज्यादा झाल्याने व वसूल कमी झाल्याने बँक अडचणीत आहे. मात्र सहा महिन्यांमध्ये सर्व सुरळीत होईल. तोपर्यंत सभासद, ठेवीदार, कर्जदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

माझे बँकेकडे दुर्लक्ष झाल्याने...

मुरकुटे म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून बँकेबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्याने ठेवीदारांमध्ये गैरसमज निर्माण झाले. ठेवीदारांचे कष्टाचे पैसे आहेत आणि ते त्यांना परत देणे ही आमची जबाबदारी निश्चितपणे आहे. परंतु मागील काही काळात वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे माझे बँकेकडे दुर्लक्ष झाल्याने आज ही परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीला व्यक्तिशः मी स्वतः आणि बँकेचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहोत. यात संचालक मंडळाचा कोणताही दोष नाही. सहकार खात्याच्या नियमानुसार दोन ठिकाणी चेअरमन राहता येत नसल्याने मला अशोक बँकेचे चेअरमनपद सोडावे लागले आणि येथेच गफलत झाली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने कामकाज केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा ठपका मुरकुटे यांनी ठेवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT