कर्जत: तालुक्यातील राशीन येथे रविवारी (दि. 31) रात्री अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठे लोखंडी होर्डिंग कोसळून अमित मोहन सुकाळे (वय 24, रा. राशीन) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हे होर्डिंग अनधिकृत असल्याचे समजते.
या प्रकरणी विकास लहू सायकर याच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राशीन येथील महात्मा फुले चौक परिसरात उभारलेल्या मोठ्या लोखंडी होर्डिंगवर एका कार्यक्रमाचे बॅनर लावले होते.
रविवारी रात्री जोरदार वादळी वारे वाहू लागल्याने बॅनर फाटू नये म्हणून अमित सुकाळे याला होर्डिंगवर चढून बॅनरला छिद्रे पाडण्यास सांगण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. बॅनरला छिद्रे पाडल्यास वाऱ्याचा दाब कमी होईल आणि बॅनर फाटणार नाही, असे सांगण्यात आल्याने अमित होर्डिंगवर चढला.
मात्र त्याच वेळी वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आणि संपूर्ण होर्डिंग कोसळले. त्याखाली सापडून अमितचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचे नातेवाईक राजू दौलत मोरे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून विकास लहू सायकर याच्याविरुद्ध पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे.
या होर्डिंगसाठी संबंधितांची अधिकृत परवानगी होती का, याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मुलानी यांनी दिली. चौकशीदरम्यान आणखी काही व्यक्तींची जबाबदारी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.