nameboard vandalism Rashin bandh
राशीन: राशीन येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकात त्यांच्या नामफलकाची समाजकंटकांनी तोडफोड करून विटंबना केली. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 4) राशीन येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळला. बंदला व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी ‘पुढारी’शी बोलताना घार्गे म्हणाले,समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. रस्त्यावर कोणीही बेकायदा अतिक्रमणे करू नयेत. (Latest Ahilyanagar News)
त्यामुळे जनतेच्या, प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. वाहनांना य-जा करण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
राशीनकरांना कोणीही वेठीस धरू नये, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कर्जतचे पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.