शशिकांत पवार
नगर तालुका: अहिल्यानगरसह राज्यातील डोंगराळ, खडकाळ आणि कोरडवाहू भागात नैसर्गिकरीत्या आढळणारा हिंगणबेट हा वृक्ष आज अनेकांसाठी अपरिचित झाला आहे. काटेरी फांद्या, लहान हिरवी फळे आणि दुष्काळातही तग धरून राहण्याची क्षमता ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. बदलत्या हवामानामुळे जंगलतोड आणि चराईच्या वाढत्या दबावामुळे या वृक्षाची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीतील गर्भगिरीच्या डोंगर रांगांमध्ये काही प्रमाणात हिंगणबेट वृक्ष आढळून येतात.
हिंगणबेट प्रामुख्याने अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, धुळे, नंदुरबार, बुलढाणा या जिल्ह्यांतील डोंगराळ व माळरान भागात नैसर्गिकरीत्या आढळतो. विशेषतः पश्चिम घाटाच्या पायथ्याचा प्रदेश, दख्खन पठार आणि कोरडवाहू भाग हे त्याचे प्रमुख अधिवास आहेत.
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तसेच काही प्रमाणात छत्तीसगड या राज्यांमध्ये आढळून येणारा हिंगणबेट वृक्ष दुर्मिळ होत चालला आहे. कमी पावसाच्या प्रदेशातही सहज वाढणाऱ्या वृक्षांमध्ये त्याची गणना केली जाते. नगर तालुक्यात बहिरवाडी आगडगाव पट्ट्यात हिंगणबेट वृक्ष चांगल्या प्रमाणात आढळून येतात.
आयुर्वेदात हिंगणबेटाला औषधी दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान आहे. साल आणि मुळांचा उपयोग सांधेदुखी व सूज कमी करण्यासाठी केला जातो. फळांचा वापर पारंपरिक औषधांमध्ये केला जातो. पचनसंस्था सुधारण्यासाठी, त्वचारोग, शरीरातील वात-कफ विकार कमी करण्यासाठी पारंपरिक वैद्य याचा वापर करत असत
हिंगणबेट हा दुष्काळातही हिरवागार राहणारा वृक्ष आहे. त्यामुळे मृदसंधारण, जैवविविधतेचे संरक्षण आणि पक्षी-कीटकांना आश्रय देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. त्याची खोलवर जाणारी मुळे जमिनीची धूप रोखण्यास मदत करतात. ग्रामीण भागात हिंगणबेटाचा उल्लेख अनेक लोककथा आणि पारंपरिक ज्ञानामध्ये आढळतो. पूर्वी गुराखी आणि आदिवासी समाज या वृक्षाची ओळख औषधी वनस्पती म्हणून जपत होते. औषधी आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचा असूनही हिंगणबेटाच्या संवर्धनाकडे अपेक्षित लक्ष दिले गेलेले नाही. वनविभाग, ग्रामपंचायती, शाळा आणि स्वयंसेवी संस्थांनी स्थानिक वृक्षलागवडीत हिंगणबेटाचा समावेश केल्यास भविष्यात हा दुर्मीळ होत चाललेला वृक्ष पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
स्थानिक हवामानाशी जुळवून घेणाऱ्या हिंगणबेटसारख्या देशी वृक्षांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. अशा वृक्षांमुळे जैवविविधता टिकून राहते आणि ग्रामीण औषधी परंपरेलाही बळ मिळते.सनी गायकवाड, वनमित्र, जेऊर
हिंगणबेट वृक्षाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. कमी पर्जन्यमान असलेल्या भागातही हे वृक्ष तग धरून राहतात. मृदसंधारणासाठी या वृक्षाचे विशेष महत्त्व आहे. बहिरवाडी डोंगर रांगांमध्ये हिंगणबेट वृक्ष आढळतात. दुर्मिळ होत चाललेल्या या वृक्षाच्या लागवड व संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.अंजना येवले, सरपंच, बहिरवाडी