Political News: पारनेर मतदारसंघातील लढत दोन राष्ट्रवादीत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून खा. नीलेश लंके यांच्या पत्नी राणी यांना अगोदरच उमेदवारी जाहीर झाली असून रविवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काशिनाथ दाते यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (उबाठा) उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले आणि पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतल्याने लंके यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.
राणी लंके यांचा राजकीय प्रवास पंचायत समिती सदस्यापासून सुरू झाला. पुढे त्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या. नीलेश लंके यांनी लोकसभेत विजय मिळवत दिल्ली गाठल्यानंतर राणी लंके यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र त्यांच्या विरोधात महायुतीकडून कोण? हे ठरत नव्हते. रविवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत पारनेरमधून काशिनाथ दाते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे दाते विरुध्द लंके अशी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान तिसर्या आघाडीकडून माजी आमदार विजय औटी आणि श्रीकांत पठारे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हे दोघे माघार घेणार की अपक्ष लढणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
प्रा. काशिनाथ दाते हे स्व. वसंतराव झावरे यांचे निकटवर्ती होते. सुरूवातीला ते राष्ट्रवादीत होते. मात्र सुजित झावरे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर दाते हे शिवसेनेत गेलेे. शिवसेनेकडून ते जिल्हा परिषद सदस्य झाले अन् लगेच सभापतीही झाले. नंतरच्या राजकारणात कोणासोबतही न जाता ते तटस्थ होते.
मात्र विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दाते यांच्यासह सुजित झावरे, माधवराव लामखडे आणि माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी गत आठवड्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. आज रविवारी त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दाते हे मुळचे तालुक्यातील कन्हेर पोखरी येथील रहिवासी आहेत. त्यांचा टायपिस्टचा व्यवसाय होता. गाव सोडून ते पारनेर शहरात निवासास आले. तेथे त्यांनी अनेक तरुणांना टायपिंग शिकवले. तेथूनच त्यांना सर ही उपाधी मिळाली. पुढे त्यांनी राजकीय प्रवेेश करत जिल्हा परिषदेचे सभापती होण्याचा मान मिळविला. आता ते थेट विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत.