Maharashtra Assembly | नाशिकमध्ये पाच ठिकाणी हाय व्होल्टेज लढती!

भुजबळ, भुसे, झिरवाळ, आहेर, फरांदे यांची प्रतिष्ठा पणाला
Maharashtra Legislative Assembly election
हाय व्होल्टेज लढतीFile Photo
Published on
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व पंधरा ठिकाणच्या लढतींचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. माघार प्रक्रियेत फार उलटफेर न झाल्यास ते कायम राहणार असल्याने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तब्बल पाच मतदारसंघांत हाय व्होल्टेज लढती अपेक्षित असून, त्यादृष्टीने बांधबंदिस्ती सुरू आहे. प्रत्यक्ष निकालात कोणाचे गड शाबूत राहतात आणि कोण जायंट किलर ठरतो, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहणार आहे.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोणाला पुन्हा संधी मिळणार, कोणाची पतंग कापली जाणार, कोण कोणत्या पक्षाची वहिवाट चोखाळणार यावर मंथन होत राहिले. राजकीय पक्षांनी आपापली मांड पक्की करण्यासाठी कंबर कसली असताना अनेकांनी स्वपक्षात वर्णी न लागल्याने इतरत्र व्यवस्था लावून घेतली. त्याच अनुषंगाने प्रारंभी एकतर्फी वाटणाऱ्या लढती आता अटीतटीच्या होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जिल्ह्यात होऊ घातलेल्या हाय व्होल्टेज लढतींपैकी काही याप्रमाणे :

येवल्यात भुजबळ विरुद्ध शिंदे

राज्याच्या राजकारणात बाहुबली समजले जाणारे मंत्री छगन भुजबळ येवल्यात पाचव्यांदा नशीब अजमवणार आहेत. आजवरच्या चार लढती लीलया जिंकणाऱ्या भुजबळ यांना यावेळी मराठा आरक्षणप्रश्नी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपायी कडवी लढत मिळणे अपेक्षित आहे. भुजबळ यांना दोन दशकांपूर्वी पायघड्या घालून येवल्याची सनद बहाल करणारे माणिकराव शिंदे हे यावेळी मविआकडून मैदानात उतरले आहेत. निवडणूक व्यवस्थापनात वाक्बदार असलेले भुजबळ हे भूमिपुत्राशी कसा सामना करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे

चांदवडला आहेर विरुद्ध आहेर विरुद्ध कोतवाल

चांदवड-देवळा मतदारसंघात विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्यास इच्छुक असलेल्या भाजपच्या डॉ. राहुल आहेर यांना कुटुंबातूनच मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यांचे चुलतबंधू तथा नाफेड संचालक केदा आहेर यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने डॉ. आहेर यांना दक्ष राहावे लागणार आहे. याशिवाय जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष शिरीष कोतवाल मविआकडून मैदानात उतरले आहेत. याचाच अर्थ तीन दिग्गजांची लढत उभ्या जिल्हावासीयांच्या औत्सुक्याचा भाग ठरणार आहे. अंतिम क्षणी केदा आहेर माघारी फिरतात की, उमेदवारी कायम ठेवतात, यावर येथील निकाल अवलंबून राहणार आहे.

दिंडोरीत झिरवाळ विरुद्ध चारोस्कर विरुद्ध महाले

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा गड मानल्या जाणाऱ्या दिंडोरीमध्ये यावेळी वेगळे वातावरण आहे. झिरवाळ यांची उमेदवारी अमान्य असलेल्या शिंदे गटाचे नेते धनराज महाले यांनी अपक्ष लढत देण्याची घाेषणा करून ऐन थंडीत राजकीय उष्मा निर्माण केला आहे. मविआकडून माजी आमदार रामदार चारोस्कर यांच्या सौभाग्यवती सुनीता यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दांडगा जनसंपर्क असलेल्या झिरवाळ यांच्यापुढे प्रथमच मोठे आव्हान उभे राहिल्याने त्यांना महाले यांची समजूत काढण्यात यश आले तरच विजयाचे प्रमेय साधता येणार आहे.

नाशिक मध्यमध्ये फरांदे विरुद्ध गीते विरुद्ध पाटील

राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे तिसऱ्यांदा नशीब अजमावणार आहेत. उद्धव सेनेचे वसंत गिते यांनी त्यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले असतानाच गतवेळी फरांदे यांना चांगली लढत दिलेल्या कॉंग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी अपक्ष लढण्याची घोषणा करून ट्विस्ट निर्माण केला आहे. तिरंगी लढतीत कोण कोणाला मात देणार, हे तूर्तास सांगणे कठीण असले तरी डॉ. पाटील अखेरपर्यंत मैदानात राहतात अथवा नाही, यावर निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे.

मालेगाव बाह्यमध्ये भुसे विरुद्ध हिरे विरुद्ध बच्छाव

पालकमंत्री दादा भुसे पाचव्यांदा नशीब अजमावू पाहत असलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात त्यांची घोडदौड रोखण्यासाठी पारंपरिक विरोधक तथा उद्धव सेनेचे अद्वय हिरे यांनी जोरदार तयारी केली आहे. भरीस भर भुसे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक असलेल्या बंडूकाका बच्छाव यांनी अपक्ष दावेदारी केली आहे. तीनही उमेदवारांची दखलपात्र व्होट बँक लक्षात घेता इथे धक्कादायक निकाल येण्याची शक्यता गडद झाली आहे. भुसे यांची भिस्त विकासकामांवर, हिरेंची पारंपरिक मतदारांवर तर बच्छावांची नातीगोती अन् नवमतदारांवर असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news