नगर: वशिलेबाजीने जर पुरस्कार दिले जाणार असतील, तर एक वेळ अभियान यशस्वी होईलही, पण ते जनतेच्या मनात कधीही यशस्वी होणार नाही. काम करूनही ज्यांना बक्षीस मिळाले नाही, त्यांच्या वेदना मी अनुभवलेल्या आहेत. ग्रामविकास मंत्री गोरे यांनी स्वतःच्या गावासाठीही शिफारस न करता पारदर्शीपणे ही प्रक्रिया राबवली. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यभरात हे अभियान निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६’ अंतर्गत ‘दुष्काळावर मात आणि समृद्ध गावांचा संकल्प’ या विषयावरील नाशिक विभागस्तरीय कार्यशाळा, पुरस्कार वितरण सोहळा व सरपंच परिसंवाद शुक्रवारी (दि. २७) अहिल्यानगर येथे उत्साहात झाला. त्या वेळी ते बोलत होते. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार सुनील कर्जतकर, आ. काशिनाथ दाते, आ. मोनिका राजळे, आ. विठ्ठलराव लंघे, आ. विक्रम पाचपुते, आ.अमोल खताळ, आ.अक्षय कर्डिले, विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक आदी उपस्थित होते.
सभापती शिंदे म्हणाले, मी कार्यक्रमासाठी थोडा वेळ अगोदर आलो होतो. सचिव आणि विभागीय आयुक्त हे एकाच खोलीत सापडले. त्यांना अभियान कसे सुरू आहे. बक्षीस कसे देतात, समिती कशी असते, असे विचारले. त्यावर विभागीय आयुक्तांनी ‘थोडी गडबड’ सुरू होती, अशी कबुली दिली. मात्र, मंत्री गोरे यांनी सर्व माणसे सारखीच आहेत. निष्पक्षपणे या अभियानाचे मूल्यांकन झाले पाहिजे, अशा सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे जर करता-करविताच वशिलेबाजीने पुरस्कार द्यायला लागला, तर अभियान करायचे कशासाठी, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. माझ्या मनातही 25 वर्षांपूर्वी निर्माण झालेला हा प्रश्न आजही तितकाच तेवत आहे. ज्यांनी कष्ट केले, त्यांना पुरस्कार मिळाला नाही तर त्यांना काय अडचणी होतात, याची जाणीव ठेवली पाहिजे. मात्र, ग्रामविकास मंत्री यांनी स्वतःच्या गावासाठीही शिफारस केली नाही, अतिशय पारदर्शीपणे त्यांनी अभियान आणलेले आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
मंत्री गोरे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचे उद्दिष्ट आहे. शहरांप्रमाणेच गावांचाही विकास होणे आवश्यक आहे. ग्रामविकासासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने आणि एकजुटीने कामकाज करणे गरजेचे आहे. पाणी फाउंडेशनचे डॉ.अविनाश पोळ यांनी अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. डॉ. गेडाम यांनी अभियानाची संकल्पना आणि नाशिक विभागातील कामांचे सादरीकरण केले. विभागाचे सचिव डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनीही मनोगत व्यक्त केले.
पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा गौरव
या अभियानात नाशिक विभागस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात दुगाव ग्रामपंचायतीने (ता. जि. नाशिक) एक कोटी रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळविले. रेनवडी (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) ग्रामपंचायतीला ८० लाखांचे द्वितीय, तर लोणी बुद्रुक (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) ग्रामपंचायतीला ६० लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले. अहिल्यानगर जिल्हास्तरावर कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) ग्रामपंचायतीने ५० लाखांचे प्रथम पारितोषिक, सौंदाळा (ता. नेवासा) - ३० लाखांचे द्वितीय आणि हिवरे बाजारला (ता. अहिल्यानगर) २० लाखांचे तृतीय पारितोषिक मिळाले.
नगरच्या सीईओंचे कौतुक, इतरांना इशारा!
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत. मात्र, काही जिल्ह्यांच्या सीईओंनी, तसेच बीडीओंनी अभियानात कामच केलेले नाही. त्यांना मागच्या वर्षीची माफी देतो, पण या वर्षी काम करावेच लागेल. मी मंत्री असलो तरी एक रुपयाला मिंधा नाही. त्यामुळे जो काम करेल, तो ‘ग्रामविकास’मध्ये दिसेल, अन्यथा त्यांची बदली कुठे होईल, हे त्यांनी पुन्हा विचारू नये, असा थेट इशारा देखील मंत्री गोरे यांनी प्रशासनाला दिला.
सभापतींच्या मनातला सल!
प्रा. शिंदे हे सरपंच असताना, त्यांच्या गावानेही स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. मात्र चांगले काम करूनही आपल्या गावाला पुरस्कार मिळाला नाही. त्या वेळी आमचा वशिला कमी पडला होता, अशा शब्दात त्यांनी सल व्यक्त केला.