नगर: जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी 8 लाख 53 हजार 265 शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत म्हणून प्रत्येकी 10 हजार रूपयांप्रमाणे 626 कोटी 26 लाख रूपयांची मदत महायुती सरकारने पुन्हा मंजूर केली असून, जिल्ह्याला आतापर्यत 1472 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)
सप्टेंबर 2025 मध्ये राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले. यामध्ये जिल्ह्यातील 6 लाख 26 हजार 265 हेक्टर क्षेत्राचे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील 8 लाख 53 हजार 265 शेतकऱ्यांना नुकसानीपोटी यापूर्वी 864 कोटी रूपयांची मदत जाहीर झाली होती. मदतीचा दुसरा टप्पा महायुती सरकारने जाहीर केला असून, रब्बी हंगामात या बाधित शेतकऱ्यांना बियाणे व खतांसाठी त्या अनुषंगाने मदत व्हावी म्हणून जिल्ह्यातील 8 लाख 53 हजार 265 शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत सरकारने जाहीर केली असून, प्रतिहेक्टरी 10 हजार रुपयांप्रमाणे या मदतीचे वितरण होणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील नुकसानीचे गांभीर्य विचारात घेवून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात उपलब्ध झालेली मदत पाहाता आतापर्यत एकूण 1 हजार 472 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी शासन संवेदनशीलपणे काम करीत असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यत 11593 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही.मकरंद जाधव पाटील मंत्री, मदत व पुनर्वसन.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून, केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करून महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री